प्रसिद्ध पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोच हिच्या हत्येप्रकरणी तिच्या भावाला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. १५ जुलै २०१६ रोजी मुलतानमधील राहत्या घरी कंदीलचा गळा दाबून खून करण्यात आला होता. या खुनाच्या आरोपाखाली तिचा भाऊ मोहम्मद वसीम, चुलता हक नवाझ आणि टॅक्सीचालक अब्दुल बासित या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. अखेर तीन वर्षांच्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर हक नवाझ आणि अब्दुल बासित यांना निर्दोष मुक्त करत कंदीलचा भाऊ मोहम्मद वसीम याला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

खळबळजनक विधाने, सतत लीक होणारे आक्षेपार्ह व्हिडीओ, फोटो व पाकिस्तानी क्रिकेट खेळाडूंबरोबर असलेले संबंध यामुळे कंदील बलोच सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असायची. भारतीय क्रिकेट कर्णधार विराट कोहलीला देखील तिने युट्यूबवरुन लग्नाची मागणी घातली होती. तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही तिने टीका केली होती. या दोन प्रकरणांमुळे कंदीलला रातोरात प्रसिद्धी मिळाली. परंतु याच प्रसिद्धीने तिचा घात केला.

“पाकिस्तानातील अनेक मोठ्या व्यवसायिकांशी तिचे नाव जोडले जात होते. तसेच सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओमुळे तिच्या कुटुंबियांना मानसिक त्रास होत होता. त्यामुळे सातत्याने होणारी बदनामी थांबवण्यासाठी हा खून केला गेला” अशी कबूली आरोपी वसीम याने केला आहे. या संपूर्ण प्रकरणात एकूण ३५ साक्षीदारांची साक्ष घेतली गेली. आणि त्यांच्या सखोल चौकशी नंतर मोहम्मद वसीम याला दोषी म्हणून घोषित केले गेले.