‘क्वांटिको’ या सीरिजमुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्याच्या घडीला एक ग्लोबल आयकॉन झाली आहे. प्रियांकाचा विविध कार्यक्रम आणि आंतरराष्ट्रीय मनोरंजन विश्वात असणारा वावर पाहता तिच्या चाहत्यांच्या संख्येतही दिवसागणिक वाढ होताना दिसतेय. गेल्या बऱ्याच वर्षांपासून परदेशातच जास्तीत जास्त वेळ व्यतीत करणारी ही ‘देसी गर्ल’ पुन्हा एकदा हिंदी चित्रपटसृष्टीत प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे.

‘जय गंगाजल’ या चित्रपटानंतर ती सलमान खानची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘भारत’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये परतणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटात ‘दबंग खान’सोबत झळकण्यासाठी तिने घसघशीत मानधन मागितलं आहे. प्रियांकाचं मनोरंजन विश्वात असणारं सध्याचं स्थान पाहताच तिने मानधनाचा आकडा वाढवला असल्याचं म्हटलं जात आहे. भारत या चित्रपटासाठी प्रियांकाने तब्बल १४ कोटी रुपयांच्या मानधनाची मागणी केल्याचं कळत आहे. सध्याच्या घडीला हिंदी चित्रपटसृष्टीत कलाकारांना मिळणाऱ्या मानधनाच्या यादीत हा आकडा अनेकांच्या भुवया उंचावत आहे.

मुख्य म्हणजे सर्वाधिक मानधन घेणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रींच्या यादीत आतापर्यंत दीपिकाचं नाव आघाडीवर होतं. कारण, ‘पद्मावत’साठी तिला १२ कोटींचं मानधन मिळालं होतं. पण, आता प्रियांकाने भारतसाठी केलेली मानधनाची मागणी पाहता जर तिला हे मानधन देण्यात आलं तर दीपिकापुढे ही ‘देसी गर्ल’ सरस ठरेल हेच खरं.

वाचा : Alia Bhatt-Ranbir Kapoor: आलिया- रणबीरच्या रिलेशनशिपविषयी काय म्हणाली पूजा भट्ट?

दरम्यान, असंही म्हटलं जात आहे, की प्रियांकाने मागितलेल्या मानधनाचा आकडा जरा जास्तच वाटत असल्यामुळे निर्मात्यांनी तो कमी करण्याचेही प्रयत्न केले. ज्यानंतर काही अंशी हा आकडा कमी करण्यात आल्याचं कळत आहे. तेव्हा आता कोट्यवधींचं बजेट आणि तगडी स्टारकास्ट असणारा भारत हा चित्रपट कधी एकदा ‘ऑनफ्लोअर’ जातो, म्हणजेच कधी एकदा या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.