गुप्तहेर व्यक्तिरेखांच्या संकल्पनेवर आधारित अमेरिकन मालिका ‘क्वांटिको’ने बरीच लोकप्रियता मिळवली. विशेष म्हणजे या अमेरिकन लोकप्रियतेमागे बॉलिवूडची देसी गर्ल अर्थात प्रियांका चोप्राचा सिंहाचा वाटा आहे. मात्र या मालिकेच्या कथानकावर भारतीयांनी आक्षेप घेतला होता. कारण नुकत्याच प्रसारित झालेल्या काही भागांमध्ये भारतीयांना दहशतवादी चेहरे म्हणून दाखवण्यात आले होते. या दृश्यांमुळे सोशल मीडियावर मालिकेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे अखेर या मालिकेची निमिर्ती करणाऱ्या कंपनीने याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे.

त्यांनी म्हटले की मालिकेतील हिंदू टेरर प्लॉटमुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या. प्रामुख्याने या साऱ्यात प्रियांका चोप्राला टीकेचे लक्ष्य करण्यात आले. मात्र तिने हा शो किंवा कथानक बनवलेले नाही. मात्र त्या विशिष्ट कथानकामुळे भावना दुखावल्या गेल्या असल्याने ABC नेटवर्कने दिलगिरी व्यक्त केली.

१ जून रोजी प्रसारित झालेल्या ‘क्वांटिको’च्या भागात मॅनहॅटनमध्ये पार पडत असलेल्या भारत- पाकिस्तान परिषदेवर अणूबॉम्बने हल्ला करण्याचा कट एक एमआयटी (MIT) प्राध्यापक रचत असल्याचे दाखवण्यात आले. हा दहशतवादी एक भारतीय असल्याचे त्यात दाखवण्यात आले होते. पाकिस्तानवर दोष देऊन भारतीय दहशतवादी परिषदेवर हल्ला करणार असल्याचे मालिकेचे कथानक होते.

याच कथानकावरून भारतीयांनी सोशल मीडियावरून त्यांच्यावर टीकेचा भडीमार केला आणि संताप व्यक्त केला होता.