टाळेबंदीचा वाढलेला कालावधी आणि त्यानंतरही चित्रपटगृहे सुरू होण्यासंदर्भातील अनिश्चितता लक्षात घेत मे ते सप्टेंबर या कालावधीत प्रदर्शनासाठी ताटकळलेले अनेक चित्रपट ओटीटीवर प्रदर्शनासाठी धडपडत आहेत. ओटीटी कं पन्यांची नव्या आशयाची गरज आणि चित्रपटगृहे बंद असल्याने प्रदर्शनाअभावी होणारे नुकसान वाचवण्यासाठी निर्मात्यांचे सुरू असलेले प्रयत्न यामुळे अमिताभ बच्चन, विद्या बालन, नवाझुद्दीन सिद्दिकी, सिद्धार्थ मल्होत्रा अशा मोठमोठय़ा कलाकारांचे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर प्रदर्शित होताना दिसणार आहेत.

नवाझुद्दीन सिद्दिकीचा ‘घूमके तू’ हा चित्रपट शुक्रवारी ‘झी ५’वर प्रदर्शित झाला. पाठोपाठ शुजित सिरकार दिग्दर्शित ‘गुलाबो सिटाबो’ हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राइमवर १२ जूनला प्रदर्शित होणार आहे. ओटीटीवर थेट चित्रपट प्रदर्शित होत असल्याने चित्रपटगृह व्यावसायिकांनी जाहीर नाराजीही व्यक्त केली असली तरी ओटीटीवर चित्रपट प्रदर्शनाचा हा सिलसिला थांबलेला नाही. अ‍ॅमेझॉन प्राइमवर काही दाक्षिणात्य चित्रपटही थेट प्रदर्शित होणार आहेत. टी सीरीज कंपनीने या वर्षी त्यांच्या बॅनरखाली निर्मिती होत असलेल्या सगळ्याच चित्रपटांच्या ओटीटी प्रदर्शनासाठी नेटफ्लिक्सबरोबर बोलणी सुरू केली आहेत. मे ते सप्टेंबर या दरम्यान ज्या चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा निश्चित आहेत, त्यातील अनेक चित्रपट हे चित्रपटगृहांअभावी ओटीटीवर प्रदर्शनाच्या तयारीत आहेत.

टाळेबंदीनंतरही चित्रपटगृहे सुरू होतील तेव्हा प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी तिथपर्यंत येतील का, हा निर्मात्यांसमोरचा मोठा प्रश्न आहे. चित्रपटांचे शो, प्रेक्षकसंख्येवर आलेली मर्यादा हे लक्षात घेता अनेक छोटय़ा बजेटच्या चित्रपटांना तिकिटबारीवर व्यवसाय करायला मिळणार नाही. दुसरीकडे सध्या ओटीटी कं पन्यांना व्यवसायवृद्धीसाठी सदस्यसंख्या वाढवणे गरजेचे असल्याने मोठमोठय़ा कलाकारांच्या चित्रपटांचा प्रीमिअर करणे ही त्यांच्यासाठी मोठी संधी आहे. त्यामुळे अनेक ओटीटी  कंपन्या चित्रपट निर्मात्यांना चांगली रक्कम देऊन चित्रपटांचे हक्क विकत घेत आहेत. शिवाय, ‘लक्ष्मी बॉम्ब’ किं वा ‘गुंजन सक्सेना’ या चित्रपटांची निर्मिती फॉक्स स्टार, झी स्टुडिओसारख्या निर्मितीसंस्थांची आहे. त्यांचे स्वत:चे ओटीटी प्लॅटफॉर्म्स असल्याने हा निर्णय अवघड नसल्याचे ट्रेड विश्लेषकांचे म्हणणे आहे.

प्रदर्शित होणारे चित्रपट

‘शकुंतला देवी – ह्य़ुमन कॉम्प्युटर’, अनुराग बासूचा ‘ल्युडो’, अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘चोक्ड’, ‘लक्ष्मी बॉम्ब’, ‘शेरशाह’, ‘इंदु की जवानी’, ‘खाली पिली’, ‘गुंजन सक्सेना – कारगिल गर्ल’, ‘रुही अफझाना’, ‘चेहरे’ हे चित्रपटही ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे.

ओटीटी कंपन्या दरवर्षी चित्रपटांसाठी खूप मोठय़ा रकमेची गुंतवणूक करतात. त्यामुळे चांगले कलाकार आणि सर्वसाधारण बजेटचे चित्रपट घेणे त्यांना सहज शक्य आहे. दरवर्षी १५ चित्रपट घेत असतील तर या वर्षी ते सहाच दर्जेदार चित्रपट प्रदर्शित करतील. निर्मात्यांनाही चित्रपटगृहात प्रदर्शनासाठी काही कोटी खर्च करावे लागतात, त्यातून सूट मिळेल आणि नफाही कमावता येईल. त्यामुळे चित्रपटगृहे पूर्वपदावर येईपर्यंत हे समीकरण निर्मात्यांना फायदेशीर ठरणार आहे.

– ट्रेड विश्लेषक – अतुल मोहन