बॉलिवूडचा ‘मॅडी’ बनून आपल्या रोमॅण्टिक अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणारा अभिनेता आर माधवन आज त्याचा ५० वा वाढदिवस साजरा करतोय. आर माधवनचा जन्म 1 जून 1970 रोजी जमशेदपूर येथे झाला होता. रात्री १२ च्या ठोक्याला त्याच्या सोशल मीडियावर फॅन्सी शुभेच्छांचा अक्षरशः पाऊस पाडायला सुरवात केली. पण यंदाच्या वर्षीच्या वाढदिवसासाठी अभिनेता आर माधवानने एक स्पेशल प्लॅन आखलाय. हा प्लॅन त्याने त्याच्या वाढदिवसाच्या दोन दिवस आधीच फॅन्शसोबत शेअर केला होता.

बॉलिवूडमध्ये काही सेलिब्रिटींची नावं ही अतिशय आदरानं आणि तितक्याच आपलेपणानं घेतली जातात. अशाच सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे आर माधवन. लोकप्रितेच्या शिखरावर असणाऱ्या याच अभिनेत्यावर सध्या त्याच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होतोय. नव्या जोमाच्या कलाकारांपासून ते अगदी दिग्गज कलाकार मित्रांपर्यंत आणि त्याचे लाखो फॅन्स त्याला सोशल मीडियावर शुभेच्छा देत आहेत. पण बॉलिवूडमधल्या कॉन्ट्रोवर्सीपासून नेहमीच दूर राहणं पसंत करणाऱ्या आर माधवनला त्याचा यंदाचा वाढदिवस शांततेत साजरा करायचा आहे. सध्या देश करोनासारख्या महामारीशी सामना करतोय. यंदाची परिस्थिती वेगळी आहे. सगळीकडे चिंतेचं वातावरण आहे. म्हणूनच आर माधवनने आपला यंदाचा वाढदिवस शांततेत साजरा करण्याचं ठरवलं आहे.

आर माधवनने त्याच्या ट्विटर अकाउंटवर हा स्पेशल प्लॅन शेअर केला. या ट्विटमध्ये एक पोस्ट लिहिताना आर माधवन म्हणाला, “नमस्कार माझे लाडके ट्वीपल…तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेमासाठी खूप खूप आभार…आपल्या आजुबाजुला जे काही घडतंय, हे पाहून मला वाढदिवस साजरा करायची कल्पना करवत नाही…माझा यंदाचा वाढदिवस मला जवळच्या काही लोकांसोबत शांततेत साजरा करायचा आहे.” ही पोस्ट शेअर करताना त्याने रेड हार्ट इमोजीचा देखील वापर केलाय.

आर माधवनच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं झालं तर त्याने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट ‘रॉकेटरी द नांबी इफेक्ट’ हा रिलीजसाठी तयार आहे. हा चित्रपट वैज्ञानिक आणि एअरोस्पेस इंजीनियर एस. नांबी नारायणन यांच्यावर आधारित आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाशिवाय आर माधवनने नायक नंबी नारायणन यांची भूमिका देखील साकारली आहे. ‘रॉकेटरी द नांबी इफेक्ट’ हा चित्रपट हिंदी, तेलुगु, मल्याळम, तमिळ, इंग्रजी आणि कन्नड भाषांमध्ये रिलीज होणार आहे.