मुंबई पोलिस दररोज आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून क्रिएटीव्ह पोस्ट शेअर करत असतात. नुकतंच मुबंई पोलिसांनी शेअर केलेलं एक ट्विट सध्या वेगाने व्हायरल होत आहे. मुंबईत कलर कोड सिस्टीम लागू झाल्यापासून लॉकडाऊनमध्ये प्रेयसीला भेटण्यासाठी कुठल्या कलरचा वापर करू, असा प्रश्न करणाऱ्या तरूणाला मुंबई पोलिसांनी दिलेलं तितकंच मजेदार उत्तर सध्या जोरदार चर्चेत आहे. तणावाच्या आजच्या परिस्थितीतही पोलिसांनी दिलेल्या या सकारात्मक प्रतिसादाचं बॉलिवूड अभिनेता आर माधवनने कौतुक केलं आहे.

मैत्रिणीला भेटण्यासाठी कोणता कलर कोड विचारणाऱ्या या तरूणाला उत्तर देताना ”मैत्रिणीला भेटणं तुमच्यासाठी अत्यावश्यक आहे हे आम्ही समजू शकतो. मात्र, दुर्दैवानं ही गोष्ट आमच्याकडील अत्यावश्यक सेवांच्या यादीत मोडत नाही,’ असं पोलिसांच्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. ‘अंतर राखल्यानं प्रेम वाढतं आणि सध्याच्या काळात तुमच्या आरोग्यासाठीही ते चांगलं आहे. हा केवळ एक टप्पा आहे. आपण संपूर्ण आयुष्य एकत्र घालवावं ही सदिच्छा,’ असंही पोलिसांनी ट्वीटमध्ये पुढं म्हटलं आहे.

मुंबई पोलिसांच्या या गमतीदार उत्तराला आर माधवनने शाबासकी देत ट्विट केलं आहे. ”व्हेरी वेल पुट, मला खात्री आहे तितक्याच चांगल्या पद्धतीने त्याला समजलं असणार…”, असं या ट्विटमध्ये लिहीलंय.


आर माधवनने कौतूक केलेल्या ट्विटवरही मुंबई पोलिसांनी उत्तर दिलं आहे. ”आम्हालाही तीच आशा आहे, हे रॉकेट्री नाही”, असं या ट्विटमध्ये मुंबई पोलिसांनी म्हटलंय. आर माधवनने नुकतंच एका बहूभाषी चित्रपटासाठी लेखन आणि निर्देशन केलंय. या चित्रपटाचं नाव ‘रॉकेट्री’ आहे. काही दिवसांपुर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय आणि त्याला तुफान प्रतिसाद मिळतोय. हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगू आणि कन्नड भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.