बॉलिवूडमध्ये करिअर घडवत असतानाच अनेक अभिनेते-अभिनेत्रींना हॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा असते. बॉलिवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केल्यानंतर अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोणने हॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमावले. दोघींना अपेक्षित यशही मिळाले. मात्र बॉलिवूडमध्ये पदार्पण करून काही वेळ झाला असतानाच अभिनेत्री क्रिती सनॉन हॉलिवूडची स्वप्ने रंगवतेय.

क्रितीला हॉलिवूडचे तिकिट हवे आहे आणि यासाठी तिने प्रयत्नही सुरू केलेत. प्रियांका आणि दीपिका प्रमाणेच क्रितीला हॉलिवूडमध्ये करिअर घडवायचे आहे. प्रियांका आणि दीपिकाने बॉलिवूड चित्रपटांमध्ये यशस्वी झाल्यानंतरच हॉलिवूड प्रोजेक्ट्सना साईन केले होते. मात्र क्रिती बॉलिवूडमध्ये अद्याप कोणतीच कमाल दाखवू शकली नाही. नुकताच प्रदर्शित झालेला तिचा ‘राबता’ चित्रपटदेखील बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरला. बॉलिवूडमधील फ्लॉप चित्रपटांचा क्रितीच्या हॉलिवूड स्वप्नांवर फारसा फरक पडलेला दिसत नाहीये. ती हॉलिवूड चित्रपटांमध्ये भूमिका मिळवण्यासाठी मदत करणाऱ्या हॉलिवूड एजन्सींच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे. आपल्या करिअरच्या सुरुवातीलाच क्रिती बॉलिवूडपेक्षा हॉलिवूडमध्येच काम करण्यासाठी उत्सुक आहे.

वाचा : अमरनाथ यात्रेकरूंचे प्राण वाचवणाऱ्या बसचालकाला सोनू निगमकडून बक्षीस

आजकाल ठराविक अभिनेत्रींना वगळल्यास सर्वांनाच हॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा असते. बॉलिवूडमध्ये यशस्वी झाल्यानंतरच हॉलिवूडमध्ये नशीब आजमावले जाते. मात्र क्रिती बॉलिवूडमध्ये चांगली कामगिरी करण्याआधीच हॉलिवूडचा व्हिसा मिळवण्यासाठी प्रयत्न करतेय. आता क्रितीला हॉलिवूडचे तिकिट कधी मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.