‘पलटन’ या चित्रपटाच्या निमित्ताने जे.पी. दत्ता पुन्हा एकदा देशाच्या सैन्यदलाचं कर्तृत्व प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ज्यानंतर आता चित्रपटातील आणखी एक गाणं प्रेक्षकांचं लक्ष वेधत आहे. ‘रात कितनी दास्ताने कह रही है’ असे बोल असणाऱ्या या गाण्यात सीमेवर आपल्या कुटुंबापासून आणि प्रियजनांपासून दूर असणाऱ्या सैनिकांच्या मनाची घालमेल नेमकी काय असते, याचं चित्रण केल्याचं पाहायला मिळत आहे.

जे.पी. दत्ता यांच्या दिग्दर्शनात साकारलेल्या या चित्रपटातील ‘रात कितनी’ या गाण्याच्या निमित्ताने जावेद अख्तर, सोनू निगम, अन्नू मलिक पुन्हा एकत्र आले असून, कलाकारांची ही घडी अगदी सुरेखपणे बसली आहे. मुख्य म्हणजे ‘बॉर्डर’मधील ‘संदेसे आते है’, तो चलू आणि ‘LOC कारगिल’ मधील ‘सुनो जानेवाले’ या गाण्याची आठवण ‘पलटन’मधील हे गाणं पाहताना होत आहे. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या पलटनच्या निमित्ताने ‘बॉर्डर’ आणि ‘एलओसी…’ या चित्रपटांकडे लक्ष वेधलं जात आहे.

वाचा : मानधन न स्विकारताही आमिर असा कमावतो बक्कळ नफा

सोनू निगमने गायलेल्या या गाण्यात आपल्या कुटुंबाला मागे सोडून सीमेवर लढण्यासाठी जाणाऱ्या सैनिकाची विविध रुपं पाहायला मिळत आहे. एक भाऊ, पती, मुलगा, प्रियकर आणि देशसेवेसाठी दक्ष असणारा सैनिक साकारणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या मनात नेमका भावनांचा समुद्र कशा प्रकारे उसळत असतो, याचं चित्रण गाण्यात केलं गेल्याचं लक्षात येत आहे. भारत आणि चीनच्या सैन्यादरम्यान १९६७ मध्ये झालेल्या नथु ला संघर्षावर ‘पलटन’ची कथा आधारित आहे.