‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्या क्रशसोबत काम करायला मिळत असल्यामुळे अभिनेत्री आलिया भटट्चा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आलियाचा हा क्रश म्हणजे ‘सावरिया’ रणबीर कपूर. अनेक तरुणींच्या मनावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्यासोबत आलिया स्क्रीन शेअर करण्यासाठी सज्ज झाली असून, सध्या हे दोघंही आगामी चित्रपटावर लक्ष केंद्रित करत आहेत. असं असलं तरीही आलिया आणि रणबीरच्या नात्यात असलेली सहजता आणि त्यांनी मैत्री सध्या बऱ्याच चर्चांना तोंड फोडत आहे.

सोनम कपूरच्या लग्नाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रिसेप्शन सोहळ्याला आलिया आणि रणबीर या दोघांनीही एकत्र हजेरी लावली तेव्हापासून तर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना प्रचंड उधाण आलं. त्यातही एका मुलाखतीदरम्यान रणबीरविषयी विचारताच आलियाने दिलेल्या प्रतिक्रिया या चर्चांना आणखी वाव देण्यास कारणीभूत ठरली. दिवसागणिक आलिया आणि रणबीरच्या प्रेमाचे किस्से समोर येत असतानाच ऋषी कपूर यांच्या ट्विटने या चर्चांना खतपाणी घातलं. त्यातच आता भर म्हणून रणबीरची आई, अभिनेत्री नीतू कपूर, यांच्या एका कमेंटमुळेही आलियाला त्यांची पसंती असल्याचं कळत आहे. नेटकऱ्यांनी लावलेला हा अंदाज आणि आलियाच्या एका फोटोवर रणबीरच्या आईची कमेंट पाहता, यावर अनेकजण विचार करण्यास भाग पडत आहेत.

वाचा : प्रवासखर्च कमी करण्याच्या सोप्या टिप्स

आलियाने इन्स्टाग्रामवर आईसोबतचा एक फोटो पोस्ट केला होता, जो नीतू कपूर यांनी लाईक केला. त्यासोबतच त्यावर कमेंटही केली. त्यांच्या कमेंटला आलियानेही किसिंग इमोजी पाठवून उत्तर दिलं. सोशल मीडियावर झालेल्या त्यांचा हा संवाद सध्या अनेकांचच लक्ष वेधत असून, चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे आता येत्या काळात रणबीर- आलियाच्या रिलेशनशिपविषयी कोणती गोष्ट समोर येते, की या फक्त अफवाच ठरतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.