Race 3 collection : गेल्या आठवड्यात सलमानचा ‘रेस ३’ प्रदर्शित झाला. बिग बजेट आणि तगडी स्टारकास्ट असणाऱ्या या चित्रपटाविषयी समीक्षकांनी फार चांगल्या प्रतिक्रिया दिल्या नसल्याचं पाहायला मिळालं. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून हा चित्रपट तर सोशल मीडियावर अक्षरश: ट्रोलिंगचा विषय ठरला होता. नेटकऱ्यांनी तर या चित्रपटाची आणि त्यातल्या संवादाची यच्छेद खिल्ली उडवली. उत्तम कथानक, संवाद, पटकथा यासगळ्या शर्यतीत ‘रेस ३’ मागे पडला असला तरी कमाईच्या शर्यतीत मात्र हा चित्रपट वरचढ ठरला आहे. १०० कोटींचा गल्ला जमावण्यास हा चित्रपट वरचढ ठरला आहे.

Race 3: ‘रेस ३’ फेसबुकवर लीक

पहिल्याच दिवशी या चित्रपटानं २९ कोटींहून अधिक कमावले होते. हा चित्रपट पहिल्याच दिवशी ३४ कोटींची कमाई करेल असा अंदाज वर्तवण्यात येत होता. ईदच्या दिवशी यापूर्वी सलमानचे जे चित्रपट प्रदर्शित झाले त्या तुलनेत या चित्रपटाची पहिल्या दिवशीची कमाई कमीच होती. पण या रविवारपर्यंत या चित्रपटाला १०० कोटींचा गल्ला जमवण्यात यश आलं आहे. तीन दिवसांत एवढी विक्रमी कमाई पुन्हा एकदा सलमाननं करून दाखवली आहे. फक्त भारतातच नाही तर अमेरिकेत या चित्रपटाने पहिल्या दिवशी २.१ कोटी, ऑस्ट्रेलियामध्ये ७० लाख आणि न्यूझीलंडमध्ये ४७ लाखांचा गल्ला जमवला आहे.

तुमची डोकेदुखी अजून वाढवायला येतोय ‘रेस ४’

त्यामुळे कथानक दमदार नसलं तरी केवळ सलमान या एका नावामुळे या चित्रपटाला भरभरून यश मिळाल्याचं म्हटलं जातं आहे. यावेळीदेखील ईदलाच चित्रपट प्रदर्शित करण्याचा सलमानचा फंडा पुन्हा एकदा यशस्वी झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे आता २०० कोटींचा गल्ला जमवण्याच्या दिशेनं सलमानची ‘रेस’ सुरू झाली आहे.