बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘राधे-युवर मोस्ट वॉंटेड भाई’ हा चित्रपट १३ मे रोजी प्रदर्शित झाला. करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे भारतात हा चित्रपट Zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला. पण यूएई आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये चित्रपटाने चांगली कमाई केल्याचे पाहायला मिळते.

सलमानचा ‘राधे-युवर मोस्ट वॉंटेड भाई’ हा चित्रपट प्रदर्शित होताच पहिल्याच दिवशी यूएईमध्ये प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एक्सपर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार ‘राधे’ चित्रपटाने यूएई आणि ऑस्ट्रेलियामध्ये एकूण ४ लाख डॉलर म्हणजेच २.९४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने इतकी कमाइ केल्यानंतर विकेंडला चित्रपट काय जादू करणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

आणखी वाचा : मुलांसोबत का राहात नाही? नीतू कपूर यांनी सांगितले कारण

बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, ‘राधे-युवर मोस्ट वॉंटेड भाई’ प्रदर्शित होण्यापूर्वीच चित्रपटाचे डिजिटल, थिएटर आणि सॅटेलाइट हक्क हे जवळपास २३० कोटी रुपयांना विकले गेले होते.

‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटात सलमानसोबत दिशा पटाणी, रणदीप हुड्डा, जॅकी श्रॉफ, गोविंदा, गौतम गुलाटी, प्रविण तरडे हे कालाकार दिसत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभु देवाने केले आहे. या चित्रपटाची घोषणी २०१९मध्ये करण्यात आली होती. २०२०मध्ये ईदला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली.