अभिनेता आयुषमान खुरानाने ‘विकी डोनर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. शूजित सरकार दिग्दर्शित या चित्रपटातून एका अनोख्या विषयावर भाष्य करण्यात आलं होतं. यामध्ये आयुषमानसोबत अभिनेत्री यामी गौतम झळकली होती. पण ‘विकी डोनर’साठी यामी ही पहिली पसंत नव्हती. राधिका आपटेला या भूमिकेसाठी सर्वांत आधी विचारलं होतं. पण वाढलेल्या वजनामुळे ही भूमिका गमावल्याची खंत राधिकाने एका चॅट शोमध्ये व्यक्त केली.

‘मी एक महिना सुट्टीवर होती. या सुट्टीत खाण्यापिण्यावर नियंत्रण न राहिल्याने माझं वजन काही किलोंनी वाढलं होतं. शूटिंगपूर्वी मी वजन कमी करेन असं आश्वासन दिग्दर्शकांना दिलं होतं. पण त्यांना ते पटलं नाही. ‘विकी डोनर’मधील भूमिका गमावल्यानंतर डाएटबाबत मी अधिकच सतर्क राहू लागले,’ असं राधिकाने सांगितलं.

चित्रपटसृष्टीत अनेकदा कलाकारांना नकार पचवावा लागतो. ते पचवणं माझ्यासाठी फार कठीण नाही. पण वाढलेल्या वजनाचा मुद्दा माझ्या डोक्यात कायम राहिला, असं ती सांगते.

राधिकासोबत या चॅट शोमध्ये ‘विकी डोनर’चा मुख्य अभिनेता आयुषमान खुरानासुद्धा उपस्थित होता. राधिकाला नाकारण्याबाबत विचारलं असता तो म्हणाला, ‘त्या चित्रपटावेळी मी खूप बारिक होतो. त्यामुळे माझ्यासोबत राधिकाची जोडी जमली नसती.’ राधिकाने त्यावेळी जरी आयुषमानसोबत काम करण्याची संधी गमावली असली तरी २०१८ मध्ये दोघांचा ‘अंधाधून’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर चांगलाच गाजला.