सुप्रसिद्ध दिग्गज गायिका आशा भोसले यांचा आज वाढदिवस. संपूर्ण चित्रपटसृष्टीतूनच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. असे असताना अभिनेत्री राधिका आपटेसुद्धा आशाताईंना एक खास ‘गिफ्ट’ देणार आहे. राधिका तिच्या नृत्याद्वारे आशाताईंना मानवंदना देणार आहे. एका कार्यक्रमामध्ये राधिका तिचे नृत्य सादर करणार आहे.
विविध भूमिकांसाठी नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री राधिका आपटेने नृत्याचे प्रशिक्षण घेतले आहे. ‘कन्टेम्प्ररी’ नृत्य प्रकारात राधिकाने लंडनमध्ये रितसर प्रशिक्षण घेतले आहे. आपल्या या अनोख्या नृत्यशैलीतून राधिका आशाताईंनी गायलेल्या विविध गाण्यांद्वारे आशाताईंना मानवंदना देणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राधिका सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक टेरेंस लुइसह नृत्य करणार आहे. ‘कन्टेम्प्ररी’ आणि ‘लॅटिन’ प्रकारच्या नृत्यांची सांगड घालत राधिका आणि टेरेंस त्यांचे नृत्य सादर करतील.
एका मुलाखतीत ‘अभिनयाव्यतिरिक्त जर इतर कोणत्या गोष्टीत मला रस असेल तर ते नृत्य आहे. आणि त्यातही आशा भोसले यांना मानवंदना देण्यासाठी मी फारच उत्सुक आहे’ असे राधिका म्हणाली. राधिका नुकतीच ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये दिसली होती. ‘लॅक्मे फॅशन वीक २०१६’ मध्ये डिझायनर सरोज जलानच्या कलेक्शनला सादर करण्यासाठी राधिका रॅम्पवर उतरली होती. यावेळी तिला तिच्या वक्तव्यावर येणाऱ्या नकारात्मक प्रतिक्रियांबाबत विचारले असता तिने आपले मत मांडले. ‘काही न बोलताही अनेकदा तुम्हाला काही नकारात्मक प्रतिक्रियांचा सामना करावा लागतोच. त्यामुळे इतरांच्या नकारात्मक प्रतिक्रियांना घाबरण्याचे कारणच नाही. कोणत्याही बाबतीत माझे दुमत नसते त्यामुळे मी मला जे योग्य वाटते तेच करते’, अशी ठाम भूमिका राधिकाने मांडली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 8, 2016 5:19 pm