बॉलीवूड बादशहा शाहरुख खान याचा ‘रईस’ चित्रपट सर्व देशभरात प्रेक्षकांची मने जिंकत आहे. प्रमोशनमध्ये कोणतीही कसर बाकी न ठेवणा-या शाहरुखने पुन्हा एकदा त्याच्या चाहत्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले आहे. संजय गुप्ता दिग्दर्शित आणि अभिनेता हृतिक रोशनची मुख्य भूमिका असलेला ‘काबिल’ चित्रपट स्पर्धेत असतानाही ‘रईस’ चित्रपटाने भारतात १०० कोटींच्यावर गल्ला जमविला आहे.

शाहरुखच्या ‘रईस’ने सोमवारी ८.२५ कोटी तर मंगळवारी ७.५२ कोटींचा गल्ला जमविला. या चित्रपटाने भारतात १०९.०१ कोटींची कमाई केली आहे. व्यापाऱ समिक्षक रमेश बाला यांनी केलेल्या ट्विटनुसार, १०० कोटींच्या क्लबमध्ये जाणारा शाहरुखचा हा सातवा चित्रपट आहे. या चित्रपटाने अजय देवगण आणि अक्षय कुमारलाही मागे टाकले आहे. या दोन्ही कलाकारांचे १०० कोटींच्या क्लबमध्ये सहा चित्रपट आहेत.

रमेश बाला यांनी ट्विट केलेय की, ‘रईस’ने सोमवारी (३० जानेवारी) ८.२५ कोटी आणि मंगळवारी (३१ जानेवारी) ७.५२ कोटी कमविले. भारतात चित्रपटाची निव्वळ कमाई – १०९ कोटी तर एकूण कमाई – १५१.४ कोटी इतकी आहे. जगभरात ‘रईस’ने २१५.७ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाने पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान हिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. मात्र, ही अभिनेत्री आतापर्यंत भारतात काम केलेल्या इतर पाकिस्तानी कलाकारांच्या तुलनेत प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यास अयशस्वी ठरली. शाहरुख व्यतिरीक्त नवाजुद्दीन सिद्दिकी, सनी लिओनी यांनीही चित्रपटासाठी काम केले आहे. नवाजुद्दीनच्या कामास समिक्षकांनी विशेष नावाजले आहे.

दरम्यान, शाहरुखच्या ‘रईस’ची आमिर खानच्या ‘दंगल’शी कोणतीच तुलना होणे शक्य नाही. जगभरात ‘धाकड’ कमाई करणा-या ‘दंगल’ने आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणा-या चित्रपटाच्या यादीत द्वितीय स्थान पटकाविले आहे. ‘पीके’नंतर सर्वाधिक कमाई करणारा ‘दंगल’ हा भारतातील दुसरा चित्रपट ठरला आहे.