टीव्ही शो रोडीजमध्ये तुम्ही रघु रामला संतापून तर कधी रागवून स्पर्धकांचा अपमान करताना खूपदा पाहिलं असेलच. पण रघ रामने एकदा इंडियन आयडलमध्ये ऑडिशन दिली होती, हे खूप कमी लोकांना माहितेय. पण या ऑडिशनमध्ये रघुने अगदीच बेसूर गाणं गायलं होतं. त्यावेळी त्याचं परिक्षण करण्यासाठी अनु मलिक, फराह खान आणि सोनू निगम हे तीन परिक्षक बसले होते. तुम्हा सर्वांना आश्चर्य वाटेल, या ऑडिशनच्या वेळी परिक्षक अनु मलिक यांनी रघु रामचा पुरता अपमान केला होता.

इंडियन आयडलच्या पहिल्या सीजनमध्ये दिलं होतं ऑडिशन

२००३ साली इंडियन आयडलच्या पहिल्या सीजनमध्ये ऑडिशन देण्यासाठी रघु राम पोहोचला होता. त्याने गायलेलं बेसूर गाणं ऐकून “तू गाणं गाऊ शकत नाहीस”, असं परिक्षकांच्या खुर्चीत बसलेले अनु मलिक, फराह खान आणि सोनू निगम यांनी स्पष्टपणे सांगितलं. हे ऐकून रघु रामला खूप राग आला. परिक्षकांचं वागणं त्याला खटकू लागलं. यावर त्याने अनु मलिक यांची बोलण्याची पद्धत आवडली नाही, असं परखडपणे सांगितलं.

फराह खान झाली इरिटेट

रघु राम जेव्हा ऑडिशनसाठी पोहोचला त्यावेळी गाणं गाण्याआधीच स्ट्रेचिंग करायला सुरवात केली. त्यावेळी तो म्हणाला, “जेव्हा मी गाणं गातो तेव्हा मला स्ट्रेचिंग करावं लागतं…काही लोक आलाप वगैरे करतात.” यावर फराह खान इरिटेट झाली आणि म्हणाली, “स्पर्धकांना ऑडिशनसाठी केवळ २ मिनीटं मिळतात, तुम्ही त्यातली ३० सेकंद वाया घालवली.”

कोणालाच आवडलं नाही रघु रामचं गाणं

या ऑडिशनमध्ये रघु रामने ‘आज जाने की जिद न करो’ हे गाणं गायलं होतं. पण समोर बसलेल्या कोणत्याच परिक्षकाला त्याचं हे गाणं आवडलं नाही. यावर सोनू निगम त्याला विचारतो, खूपच बेसूर गाणं गायलंस तु, जे तू गाणं निवडलंस, हे बेस्ट आहे का तुझं ?” यावर रघु स्पष्टीकरण देताना म्हणाला, “मला असं वाटलं की तुम्हा सर्वाना हे गाणं आवडेल”

अनु मलिक झाले कठोर

यावेळी रघुला विचारण्यात आलं की, “तू गाणं गाण्याआधी स्ट्रेचिंग का करतोस ?” यावर उत्तर देताना रघु म्हणाला, “मला एक त्रास आहे”. यावर फराह म्हणाली, “गाणं गाण्याचा त्रास?” रघु यावर नाराज झाला आणि म्हणाला, “माझ्या शरीरात त्रास होतो, कृपया याचा विनोद करू नका.” हे सगळं पाहून अनु मलिक म्हणाले, “बरं, तू गाण्याआधी स्ट्रेचिंग केलंस, पण तुझी स्ट्रेचिंग गाण्याच्या सुरांपर्यंत नाही पोहोचली.” यापुढे थोडं कठोर होत अनु मलिक म्हणाले, “माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की तू गाऊ शकत नाहीस, माझ्या मते तू मुंबईत येऊ शकणार नाहीस.”

सोनू निगमने दिलं परखड उत्तर

यावेळी अनु मलिकच्या बोलण्यावर रघु नाराज झाला आणि म्हणाला, “तुमचं हेच म्हणणं चांगल्या पद्धतीने मांडू शकले असते. मला असं वाटतं हे खूप उद्धट होतं. कुणी माझ्याशी उद्धटपणे बोललेलं मला नाही आवडत. अर्थातच तुमच्याशी कुणी उद्धट बोललेलं हे तुम्हाला स्वतःला आवडणार नाही.” यावर सोनू निगम आपल्या साथीदारांची बाजू घेत म्हणाला, “तुम्ही स्वतः उद्धट होत आहात, जेव्हापासून तुम्ही आत प्रवेश केलाय तेव्हापासून तुम्ही सेलिब्रिटी असल्याच्या एटीट्यूडमध्ये आहात.” परिक्षकांशी वाद घातल्यानंतर रघु राम ऑडिशन रूममधून बाहेर पडला.