दिवंगत नेते प्रमोद महाजन, यांचा मुलगा राहुल महाजन पुन्हा एकदा बोहल्यावर चढला आहे. राहुलनं २५ वर्षीय कझाकिस्तानी प्रेयसी नात्याला लिनासोबत लग्नगाठ बांधली आहे. नुकताच मलबार हिल परिसरात या दोघांचा विवाहसोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी काही मोजकेच लोक उपस्थित होते.

राहुल महाजनचं हे तिसरं लग्न आहे. याआधी राहुल महाजननं वैमानिक श्वेता सिंग सोबत लग्न केलं होतं. मात्र हे लग्न फार काळ टिकलं नाही. त्यानंतर ‘राहुल दुल्हनियाँ ले जायेंगे’ या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून राहुलनं डिंपी गांगुलीशी लग्न केलं. लग्नानंतर केवळ चार महिन्यांतच राहुलने मारहाण केल्याची तक्रार डिंपीने केली होती. लग्नानंतर पाच वर्षांत दोघांचा घटस्फोट झाला. राहुलपासून विभक्त झाल्यानंतर डिंपीनं दुबईस्थित उद्योजक रोहित रॉय याच्याशी विवाह केला.

२०१६ मध्ये राहुलचं नाव मॉडेल अमृता मानेसोबत जोडलं गेलं. राहुल आणि अमृता एकमेकांशी लग्न करणार असंही म्हटलं जात होतं. मात्र आता राहुलनं कझाकिस्तानी मॉडेलशी लग्न केलं आहे. दोन लग्न अपयशी झाल्यानंतर मला तिसऱ्या लग्नाबद्दल कोणालाही सांगायचं नव्हतं, म्हणूनच कोणताही गाजावाजा न करता छोटेखानी विवाहसोहळा आटोपला अशी माहिती राहुलनं दिली. राहुल आणि नात्याला गेल्या दीड वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.