News Flash

सलमानसाठी ‘रेल्वे’ लकी!

‘सलमान खान’ आणि ‘रेल्वे स्टेशन्स’ हे हिट समीकरण आहे हे खुद्द रेल्वेच्या अधिकाऱ्यांनीही मान्य केलं आहे.

| June 28, 2015 07:14 am

‘सलमान खान’ आणि ‘रेल्वे स्टेशन्स’ हे हिट समीकरण आहे हे खुद्द रेल्वेच्या अधिकाऱ्यांनीही मान्य केलं आहे. ‘तेरे नाम’ या चित्रपटाने सलमानचं आयुष्य बदलून टाकलं. या चित्रपटात नायिकेला भेटण्यापासून ते जखमी होण्यापर्यंतची अनेक दृश्य रेल्वेत आणि रेल्वे स्थानक परिसरात चित्रित करण्यात आली होती. या चित्रपटाने अमाप यश मिळवलं. त्यापाठोपाठ ‘वाँटेड’मध्येही रेल्वेतली दृश्य होती. तोही चित्रपट हिट ठरला. मग ओळीने ‘दबंग’, ‘बॉडीगार्ड’, ‘दबंग २’ आणि ‘किक’ या चित्रपटात ‘रेल्वे’ परिसर दिसले आणि हे चित्रपट हिट ठरले. त्यामुळे रेल्वे स्टेशन्स आपल्या चित्रपटांना लाभी ठरतात, असा समज सलमानच्या मनात पक्का बसला असून ‘बजरंगी भाईजान’साठीही त्याने खास रेल्वे परिसरात चित्रीकरण करून घेतले आहे.
‘तेरे नाम’ चित्रपटात सलमानची बहुतेक दृश्ये रेल्वे परिसरात होती. अगदी त्याला ट्रेनवर आपटून जखमी केले जाते ते दृश्यही प्रेक्षक विसरले नाहीत. या चित्रपटाला यश मिळाल्यानंतर पाठोपाठ आलेल्या त्याच्या चित्रपटांचे चित्रीकरणही रेल्वे परिसरात केले गेले. ‘वाँटेड’मधील लोकलची दृश्ये, चित्रपटात अंधेरी स्थानकाचा झालेला उल्लेख ते नायिकेला सतावणाऱ्या गुंडांना लोकलबाहेर फेकणारा सलमान या दृश्यांमुळे मुंबईची लोकलही चांगलीच लोकप्रिय झाली. नंतरच्या ‘बॉडीगार्ड’, ‘दबंग’ आणि ‘दबंग २’ या तीनही अ‍ॅक्शनपटांसाठी सलमानने रेल्वे यार्डाच्या परिसराचा वापर केला. रेल्वेपरिसरात चित्रित झालेल्या चित्रपटांमध्ये सलमानच्या चित्रपटांची संख्या जास्त आहे हे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनीही मान्य केले आहे. सलमानचे फार्महाऊस पनवेलमध्ये असल्याने साधारणत: पनवेल, रोहा आणि आपटा परिसरांत त्याच्या चित्रपटांचे चित्रीकरण प्रामुख्याने केले जाते, असे रेल्वेचे अधिकारीही सांगतात.
‘दबंग’मधील अ‍ॅक्शन दृश्यांसाठी सलमानने रेल्वे यार्डाचा वापर क रून घेतला होता. त्याच्यामुळे रेल्वेतील काही यार्डाचा परिसरही यापुढे चित्रीकरणासाठी उपलब्ध करून देण्याची कल्पना पुढे आली आहे. काहीही असले तरी आता चित्रपटाचे यश आणि रेल्वे परिसरात चित्रीकरण या गोष्टी त्याच्यासाठी फारच महत्त्वाच्या ठरू लागल्या आहेत. म्हणूनच, त्याने दिग्दर्शक कबीर खानला आग्रहाने चित्रपटातील महत्त्वाचा प्रसंग रेल्वे परिसरात चित्रित करायला लावला असल्याचे सूत्रांनी सांगितले. ‘बजरंगी भाईजान’मधील काही दृश्ये सलमानच्या फार्महाऊसमध्ये चित्रित करण्यात आली आहे. त्यामुळे पनवेल जवळच्याच रेल्वे परिसरात याचे चित्रीकरण झाले असावे. कबीर खानचा ‘एक था टायगर’ हा आंतरराष्ट्रीय गुप्तहेरांवर होता. तिथेही सलमानने ट्रेन सोडली नाही. ‘एक था टायगर’मध्ये सलमानने केलेला ट्रेनवरचे स्टंट दृश्य त्याचा आजवरचा सुपरहिट स्टंट मानला जातो. अगदी ‘जय हो’ साठीही सलमानने बदलापूर जवळील रेल्वे परिसरात चित्रिकरण केले होते. सलमानच्या या ‘रेल्वे’ प्रेमाचा फायदाही दुहेरी असल्याने हे प्रेम असेच वाढते राहो!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2015 7:14 am

Web Title: railway luckey for salman khan
टॅग : Salman Khan
Next Stories
1 आठवणींच्या किल्ल्यात डोकावताना..
2 हायवे!…एक सेल्फी आरपार!
3 ‘मोहेंजोदडो’नंतर हृतिक यशराजच्या चित्रपटात
Just Now!
X