पावसाचं पाणी आणि मनातली गाणी, ही संगत केवळ त्यातल्या ‘पाणी-गाणी’ या यमकापुरतीच नाही. पाऊस पडायला लागला की, अचानकच ओठांवर गाण्याच्या ओळी येतात. त्यामुळेच कदाचित या पावसाने िहदी चित्रपटसृष्टीत आपलं बस्तान सहज बसवलं आणि रसिकांना नुसती ऐकायलाच नाही, तर पाहायलाही मिळाही शेकडो पाऊसगीतं..
लहानपणी उन्हाळ्याची सुटी संपत आली की घामाघूम झालेले आम्ही घराच्या ओटीवर किंवा खिडकीत बसून एक गाणं हमखास म्हणायचो. ‘ये रे, ये रे, पावसा.. तुला देतो पसा.. पसा झाला खोटा.. पाऊस आला मोठा’ त्या खोटय़ा पशासाठी पाऊस फसून यायचा आणि कधी कधी शाळेलाही सुटी द्यायचा. त्यामुळे पाऊस आणि गाणं यांचा संबंध खूप लहानपणीच आला होता. थोडं मोठं झाल्यावर मग ‘ए आई, मला पावसात जाऊ दे’ वगरे लडिवाळ हट्टंही गाण्याच्याच साथीने केले होते. पण नाक आणि ओठ यांच्यामध्ये मिसरूड फुटू लागली आणि या पावसाची गंमत कळायला लागली. मग पावसात भिजायला जाण्याचा हट्ट करणारा तो मुलगा सोडून टीव्हीच्या स्क्रीनवर किंवा थिएटरच्या मोठय़ा पडद्यावर एखाद्या शिफॉनच्या साडीत चिंब भिजलेली आणि आपल्या अंगप्रत्यंगातून समोरच्या नायकाला आव्हान देणारी नायिका आवडायला लागली. पाऊस तेव्हाच तरुण झाला! मग त्या बालगीतातल्या ‘ये गं, ये गं सरी. माझे मडके भरी’ या ओळींऐवजी मडके भरायला आलेली तरुणी जास्त मोहक वाटू लागली.
पावसाचा आणि या गाण्यांचा सिलसिला तसा खूपच जुना. ‘श्री ४२०’मधल्या ‘प्यार हुआ इकरार हुआ’ या गाण्यापासूनचा. िहदी चित्रपट बोलायला लागले आणि मग नाटय़संगीताप्रमाणे चित्रपटांमध्येही गाणी यायला लागली. गेल्या पाच-सहा पिढय़ांवर गारुड करणारं गाणं म्हणजे हे ‘प्यार हुआ इकरार हुआ’. त्या काळी पावसात एकाच छत्रीत भिजत जाणारे राज कपूर आणि नíगस या दोघांनी अनेकांच्या भावविश्वात आदराचं स्थान मिळवलं होतं. आजही पाऊस सुरू झाला की हमखास या गाण्याची आठवण येतेच. असंच एक गाणं म्हणजे सुनील दत्त आणि आशा पारेख यांच्यावर चित्रित झालेलं ‘इतना ना मुझसे तू प्यार बढा’! तलत मेहमूद आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील या गाण्याला एक वेगळीच डूब आहे.
पण ही दोन्ही गाणी काहीही झालं तरी खूपच सौम्य म्हणावी अशी! त्यानंतरच्या काळात आलेली गाणी मात्र खूपच धम्माल आणि दंगामस्ती करणारी. सी. रामचंद्र आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातलं ‘झुमता मौसम मस्त महिना’ हे गाणं नुसतं ऐकलं तरीसुद्धा पावसात भिजल्याचाच नाही तर थेट पावसाच्या पाण्यात उडय़ा मारल्याचा, लोळल्याचा आनंद मिळतो. ‘याल्ला याल्ला दिल ले गयी’ असं म्हणत पावसात नाचणारा शम्मी कपूर आणि त्याला साथ देणारी माला सिन्हा, हे त्या पिढीच्या संतप्त आणि धसमुसळेपणाचं प्रतीकच. त्याच सुमारास आलेल्या ‘चलती का नाम गाडी’ या चित्रपटातील किशोर कुमारच्या ‘एक लडकी भीगी भागीसी’ या गाण्यातली मधुबाला तर आजही सगळ्यांना आठवत असेल. ती विसरण्यासारखी नाहीच मुळी! त्यातही पावसात चिंब भिजलेली मधुबाला आजच्या तरुणांच्या फॅण्टसीचा भाग असली, तर नवल वाटायला नको.

पावसाची गाणी खूप असली, तरी त्यातील चित्रीकरणामुळेही लक्षात राहिलेली गाणी काही निवडक आहेत. त्यात अग्रक्रम लावावा लागेल ते ‘मौसम’ या चित्रपटातील लता मंगेशकर यांच्या आवाजातील ‘रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाए मन’. याच चित्रपटात हेच गाणं किशोर कुमारच्या आवाजातही अमिताभवर चित्रित झालं आहे. पण मौशमी चटर्जी आणि अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित झालेलं आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गाणं मात्र खासच. दक्षिण मुंबईत विविध ठिकाणी पावसात भिजत चाललेले मौशमी आणि अमिताभ चांगलेच लक्षात राहिले आहेत. आजही दक्षिण मुंबईतील रस्त्यांवरून पावसात भिजताना हे गाणं ओठांवर येतंच.
दंगामस्तीच्या बाबतीत ‘हाय रे हाय, नींद नहीं आय’ या गाण्याला इतर कोणतं गाणं मागे टाकू शकेल, याचा विचार व्हायला हवा. पावसात भिजणारे नाही, तर वाट्टेल तसे डबक्यांत उडय़ा मारणारे, लोळणारे जितेंद्र आणि लीना चंदावरकर यांच्यामुळे हे गाणं अक्षरश: प्रेक्षणीय झालं आहे. या गाण्यात दोघंही पावसात ओलेचिंब झाले आहेत. या गाण्याबरोबरच राजेश खन्ना आणि झीनत अमान यांचं ‘भिगी भिगी रातों में’ हे गाणं त्या पिढीतील अनेकांच्या चांगलंच लक्षात असेल. त्यातल्या पावसापेक्षाही त्या पावसात ओलीचिंब झालेली झीनत अधिक प्रेक्षणीय होती. या गाण्यात मुलींनीही राजेश खन्नाऐवजी झीनतलाच बघितलं असणार. ‘नमक हलाल’ या चित्रपटातील ‘आज रपट जायो तो हमें ना उठय्यो’ हे अमिताभ बच्चन आणि स्मिता पाटील यांच्यावर चित्रित झालेलं गाणंही असंच िझग चढवणारं. त्या गाण्यात स्मिता पाटील नमकीन दिसली, असं अनेकांचं मत आहे.
ऐंशी आणि नव्वदीच्या दशकात वाढलेल्या अनेकांनी निळ्या साडीत चिंब भिजलेली श्रीदेवी अनिल कपूरला ‘लो आज मं कहती हूँ.. आय लव्ह यू’ असं म्हणताना नक्की ऐकली असणार. ‘मिस्टर इंडिया’मधल्या या गाण्यासाठी थिएटरमध्ये पुन्हा पुन्हा जाणारे तरुण कैक होते म्हणतात. ‘सर’ चित्रपटात अतुल अग्निहोत्री आणि पूजा बेदी यांचं ‘सुन सुन सुन बरसात की धून सुन’ असो किंवा ‘मोहरा’ मधलं ‘टीप टीप बरसा पानी’, ‘१९४२ लव्हस्टोरी’मधील ‘रिमझिम रिमझिम रूमझुम रुमझुम’ असो किंवा ‘गुलाम’ मधलं ‘आँखोसे तुने ये क्या कह दिया’ असो. पाऊस सगळ्याच गाण्यांत होता. ‘१९४२ लव्हस्टोरी’ चित्रपटातल्या त्या गाण्यातल्या मनीषा कोईरालाने अनेकांच्या स्वप्नांत प्रवेश केला होता.
पावसाचा आणि गाण्यांचा प्रवास हा खूप जुना आणि खूप मोठा आहे. अगदी आत्ताच्या ‘थ्री इडियट्स’मधल्या ‘झुबी डुबी झुबी डुबी’पर्यंतचा. एके काळी पावसाच्या पाण्यात चिंब झालेली आणि त्यातून समोरच्या नायकाला आव्हान देणारी नायिका, ही मादकतेची परिसीमा होती. आजच्या चित्रपटांमध्ये नायिका साध्या कपडय़ांतूनही ते काम करते. त्यामुळेच कदाचित आजकालच्या नायिका पावसात भिजताना फारशा दिसत नसाव्यात..