बॉलिवूडमध्ये राज कपूर आणि त्यांच्या नावाभोवती असणारे प्रसिद्धीचे वलय आपण जाणतोच. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये ‘शो मॅन’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेते राज कपूर हे भारतातच नव्हे तर इतर देशांमध्येही प्रसिद्ध आहेत. त्यांच्या काही गाजलेल्या चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘आवारा’. या चित्रपटाने फक्त भारतीय प्रेक्षकांवरच नाही, तर चिनी प्रेक्षकांवरही जादू केली होती. त्यामुळे शांघाय येथील भारतीय परिषदेचे जनरल प्रकाश गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार चीन आणि भारतादरम्यान एक निर्णय घेण्यात आला आहे.

१९५१ ला प्रदर्शित झालेल्या ‘आवारा’ या चित्रपटाला पुन्हा एकदा नाटकाच्यारुपात जिवंत केले जाणार आहे. यासाठी भारतीय सांस्कृतिक परिषद (आयसीसीआर) आणि चीन-शांघाय आंतरराष्ट्रीय कला महोत्सव (सीएसआयएएफ) यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. जवळपास सहा दशकांपेक्षा जास्त काळासाठी ‘आवारा’ हा चित्रपट चिनी रसिकांचीही दाद मिळवत होता. त्यामुळे त्याचे नाट्यरुपांतरण कसे असेल याबाबत अनेकांमध्ये उत्सुकता आहे.
राज कपूर यांचेच दिग्दर्शन आणि निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाने आजवर अनेक रसिकांची दाद मिळवली आहे.

पृथ्वीराज कपूर, नर्गिस, राज कपूर, लीला चिटणीस आणि शशी कपूर यांच्या या चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका होत्या. शशी कपूर यांनी या चित्रपटामध्ये पडद्यावर राज कपूर यांचे बालपण साकारले होते. या चित्रपटातील शंकर-जयकीशन या संगीतकार जोडीने संगीतबद्ध केलेली गाणी आजही अनेकांच्या प्लेलिस्टचा भाग आहेत.