पु. ल. देशपांडे हे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्त्व.. त्यांच्या आयुष्यावर आधारित एक सिनेमा महेश मांजरेकर घेऊन येत आहेत. भाई-व्यक्ती की वल्ली असे या सिनेमाचे नाव आहे. या सिनेमात पुलंची भूमिका अभिनेता सागर देशमुख साकारणार आहे. या सिनेमाचा पोस्टर लाँच सोहळा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते पार पडला. यावेळी राज ठाकरेंनी पु.ल. देशपांडे यांचा एक किस्सा सांगितला…

नेमका काय किस्सा राज ठाकरेंनी सांगितला?
एकदा मी पु.ल. देशपांडे आणि सुनीता देशपांडे यांना भेटायला गेलो होतो. त्यांच्या घरी एक गृहस्थ बसले होते. ते कोण होते ते ठाऊक नाही.. मात्र सुनीता बाई माझ्याशी बोलू लागल्या. गप्पांच्या ओघात ओरिएन्टल शाळेचा विषय निघाला. सुनीता देशपांडे आणि पुलं दोघेही या शाळेत शिक्षक होते. माझ्याशी बोलताना सुनीताबाई म्हटल्या, बाळ (बाळासाहेब ठाकरे) हा भाईचा विद्यार्थी.. तर श्रीकांत (श्रीकांत ठाकरे) हा माझा विद्यार्थी. हे पाहून पु. ल. देशपांडे यांच्या घरी बसलेल्या सदगृहस्थाने डोळे चमकवत पु.ल. देशपांडेंकडे पाहिले आणि विचारले काय हो बाळासाहेब ठाकरे तुमचे विद्यार्थी? त्यावेळी.. पु. लंनी चटकन उत्तर दिले मग आता आदर वाढला ना माझ्याविषयी?

राज ठाकरेंनी हा किस्सा सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. दरम्यान भाई व्यक्ती की वल्ली हा सिनेमा २०१९ मध्ये आपल्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा पावणेतीन ते तीन तासांचा असेल असे महेश मांजरेकर यांनी स्पष्ट केले आहे. तर अभिनेता सागर देशमुख या सिनेमात पुलंची भूमिका साकारणार आहे. इरावती हर्षे सुनीता देशपांडेंची भूमिका साकारणार आहे. खरेतर महेश मांजरेकर पु.ल. देशपांडे यांच्या भूमिकेसाठी महेश मांजरेकर हे आनंद इंगळे, अतुल परचुरे किंवा निखिल रत्नापारखीची निवड करतील असे वाटले होते.. अशात सागर देशमुख यांची निवड केल्याचे जाहीर करण्यात आले. पुलंची भूमिका कोण करणार याची उत्सुकता होती.. मात्र सोमवारच्या छोटेखानी सोहळ्यात सागर देशमुख पुलंच्याच वेशात अवतरला आणि सिनेमात ही भूमिका कोण साकारणार या प्रश्नाचे उत्तर सगळ्यांनाच मिळाले.