18 January 2018

News Flash

राजा परांजपे खऱ्या अर्थाने महान – मोहन जोशी

राजा परांजपे यांना संगीताचे उत्तम ज्ञान होते.

प्रतिनिधी, पुणे | Updated: April 21, 2017 2:36 AM

राजा परांजपे प्रतिष्ठानतर्फे आयोजित महोत्सवात मुक्ता टिळक यांच्या हस्ते मोहन जोशी यांना राजा परांजपे जीवनगौरव पुरस्कार गुरुवारी प्रदान करण्यात आला. अजय राणे, प्रवीण तरडे, भारत देसडला आणि अर्चना राणे या वेळी उपस्थित होत्या.

चित्रपटसृष्टीमध्ये आपली स्वतंत्र नाममुद्रा प्रस्थापित करणारे राजा परांजपे हे खऱ्या अर्थाने महान कलाकार आणि दिग्दर्शक होते, अशी भावना ज्येष्ठ अभिनेते आणि अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी गुरुवारी व्यक्त केली.

राजा परांजपे प्रतिष्ठानतर्फे आयोजित राजा परांजपे महोत्सवात महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते मोहन जोशी यांना राजा परांजपे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्यामची आई फाउंडेशनचे भारत देसडला, राजा परांजपे यांची कन्या नीला कुरुलकर, नाटय़दिग्दर्शक प्रवीण तरडे, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अर्चना राणे, विश्वस्त अजय राणे या वेळी उपस्थित होते. उत्तरार्धात तरडे यांनी घेतलेल्या मुलाखतीतून मोहन जोशी यांचा कलाप्रवास उलगडला.

मोहन जोशी म्हणाले, इतक्या मोठय़ा माणसाच्या नावाने सन्मान स्वीकारताना अंगावर शहारा आला. राजा परांजपे यांना संगीताचे उत्तम ज्ञान होते.

ज्युनिअर आर्टस्टि म्हणून काम करत करत चिकाटीच्या बळावर ते एक महान दिग्दर्शक झाले. त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे माझ्यासाठी कौतुकास्पद गोष्ट आहे.

राजा परांजपे यांचे चित्रपट मी लहानपणी आवर्जून बघितले. त्यांनी चित्रपटसृष्टीवर आपल्या नावाचा ठसा उमटविताना एक काळ गाजविला होता, असे मुक्ता टिळक यांनी सांगितले. त्यांच्या नावाचा पुरस्कार तितक्याच ताकदीच्या कलाकाराला दिला जात आहे, असेही त्या म्हणाल्या. चित्रपटसृष्टीवर चार दशके अधिराज्य गाजविणाऱ्या राजा परांजपे यांनी ‘ब्लॅक अँड व्हाईट’च्या जमान्यात पडद्यावर सात रंग भरण्याचे काम केले, असे देसडला यांनी सांगितले.

First Published on April 21, 2017 2:20 am

Web Title: raja paranjpe is great says mohan joshi
  1. No Comments.