महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. शिवरायांचा जाज्वल्य इतिहास प्रत्येक पिढीला भविष्यातील नवे क्षितिज गाठण्यासाठी सदैव प्रेरणा देत असतो. पण, महाराजांनी उभारलेल्या गडकोटांची होणारी उपेक्षा, इतिहासाचा विपर्यास पाहून शिवरायांच्या नावाचा वापर केवळ उदाहरणादाखल केला जातो आहे की काय असा प्रश्न पडतो. म्हणूनच आता ती वेळ आली आहे… इतिहास पुन्हा नव्याने सांगण्याची !! सोमवार ६ फेब्रुवारीपासून रोज रात्री ९.३० वाजता शिवकालीन इतिहास पुन्हा महाराष्ट्राच्या घराघरांत सांगितला जाणार आहे. प्रत्येकाला सामावून घेऊन स्वराज्य निर्मितीचा धगधगत्या संघर्षाचा प्रत्यय देणारी ‘राजा शिवछत्रपती’ ही मालिका पुन्हा एकदा स्टार प्रवाहवर दाखवली जाणार आहे. सध्याच्या काळात ही घटना महत्त्वाची ठरणार आहे.

‘आता थांबायचं नाय’ या विचारातून स्टार प्रवाहनं उत्तमोत्तम आशयविषय असलेल्या मालिका सादर केल्या. मराठी संस्कृती जपतानाच ‘ठेविले अनंते तैसेची राहावे’ हा विचार बाजूला सारत मराठी माणसाला त्याच्या क्षमतांची जाणीव करून देणारा हा विचार अधिक प्रभावीपणे पोहचवण्यासाठी, शिवरायांनी केलेल्या संघर्षातून प्रेरणा घेऊन नवा दृष्टीकोन देण्यासाठी खास लोकाग्रहास्तव ‘राजा शिवछत्रपती’ ही गाजलेली मालिका स्टार प्रवाह पुन्हा सादर करत आहे. ‘स्टार प्रवाह अनमोल ठेवा’ या संकल्पने अंतर्गत ही मालिका दाखवण्यात येणार आहे.

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी निर्मिती केलेल्या या मालिकेचं दिग्दर्शन हेमंत देवधर यांनी केलं आहे. अजय अतुल यांनी संगीतबद्द केलेले मालिकेचं शीर्षकगीत प्रत्येक शिवप्रेमीच्या मनामनात आहे. डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज, मृणाल कुलकर्णी यांच्या जिजाऊ, अविनाश नारकर यांचे शहाजी राजे, यतीन कार्येकर यांचा औरंगजेब आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.  इतिहासातून महाराष्ट्राच्या पुनर्निर्माणाची प्रेरणा घेण्यासाठी ही मालिका प्रत्येक मराठी माणसानं पहायलाच हवी.