लेखक व दिग्दर्शक राजेश देशपांडे आणि अभिनेत्री माधवी जुवेकर दीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा रंगभूमीवर पदार्पण करत आहेत. या दोघांच्या प्रमुख भूमिका असलेले ‘स्पिरिट’ हे नाटक या आठवडय़ात रंगभूमीवर सादर होत आहे. देशपांडे आणि जुवेकर हे दोघेही जण अनुक्रमे १४ आणि १० वर्षांनंतर रंगभूमीवर येत आहेत.
कोणीही माणूस दिसतो तसा नसतो याचा अनुभव आपल्या प्रत्येकाला दैनंदिन जीवनात येत असतो. साधा व सरळ वाटणारा माणूस बेरक्या तर बेरक्या वाटणारा माणूस साधा, भोळा असू शकतो. सध्याच्या स्पर्धेच्या जगात प्रत्येक व्यक्तीला आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. काही वेळेस हातून चुकाही घडतात. त्या चुकांचे आपण समर्थन केले तरी मनात कुठेतरी अपराधीपणाची टोचणी लागून राहते. नाटकाचे लेखक व दिग्दर्शक विजय निकम यांनी ‘स्पिरिट’ नाटकात याच विषयाचा वेध घेतला आहे. नाटकात विविध व्यक्तींच्या स्वभावाचे कंगोरे सादर करण्यात आले आहेत.
राजेश देशपांडे, माधवी जुवेकर यांच्यासह नाटकात संदेश उपशाम, संदेश जाधव, राजू तांबे, समीर पेणकर, श्रद्धा मोहिते, रसिका वेंगुर्लेकर आदी कलाकार आहेत. २३ ऑक्टोबर रोजी नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग सादर होणार आहे.