ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांनी हिंदी सिनेसृष्टीतले पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यावर टीका केली आहे. राजेश खन्ना यांना पहिला सुपरस्टार म्हणून ओळख मिळाली होती. मात्र त्यांच्याइतका वाईट अभिनेता मी पाहिला नाही असं वक्तव्य वहिदा रहमान यांनी केलं आहे. वहिदा रहमान यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील यात काहीही शंकाच नाही. राजेश खन्ना हे आपले सगळ्यात वाईट को-स्टार होते असं वहिदा रहमान यांनी म्हटलं आहे.
“राजेश खन्ना यांना सगळे सुपरस्टार मानायचे, मात्र ते सर्वात कंजूस होते. प्रत्येक वेळी त्यांच्याकडे कोणी पैशांचा विषय काढला की ते त्या चर्चेतून काढता पाय घ्यायचे. सेटवर शुटिंगसाठीही ते कायम उशिरा येत. मॉर्निंग शिफ्ट असेल तर राजेश खन्ना दुपारी उगवायचे. अनेकदा त्यांनी सेटवर येण्यास खूप उशीर लावला आहे. त्यांच्यासोबत काम करताना मला फारसा आनंद वाटला नाही.”
एका शो दरम्यान ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांना काही प्रश्न विचारण्यात आले. त्यातले काही प्रश्न त्यांच्या सहकलाकारांबाबत होते. त्याचवेळी बोलताना त्यांनी राजेश खन्ना हे हिंदी सिनेसृष्टीतले सर्वात वाईट कलाकार होते असं म्हटलं आहे. टाइम्स नाऊने या संदर्भातले वृत्त दिले आहे. वहिदा रहमान यांनी इतर अभिनेत्यांबाबतही मतं मांडली. शशी कपूर यांच्याबाबत वहिदा रहमान म्हणतात, “शशी कपूर एक सुंदर व्यक्ती होते. ते मनाने उदार होते. तर शम्मी कपूर हे खोडकर होते आणि सेटवर कायम धमाल करायचे” जय भानुशाली यांनी घेतलेल्या मुलाखतीत वहिदा रहमान यांनी ही उत्तरं दिली आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 4, 2019 9:58 pm