पुस्तक प्रकाशन व्यवसायात आपली स्वतंत्र मुद्रा उमटविणाऱ्या राजहंस प्रकाशनाने या व्यवसायातील साठ वर्षे नुकतीच पूर्ण केली आहेत. हीरकमहोत्सवी पूर्तीच्या निमित्ताने प्रकाशन संस्थेतर्फे वाचक आणि ग्रंथप्रेमींसाठी अभिनव योजना जाहीर करण्यात आली आहे.
या योजनेत आता राजहंस प्रकाशनाची तीनशेहून अधिक पुस्तके ३१ मेपर्यंत २० ते २५ टक्के सवलतीमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या योजनेत साठ निवडक पुस्तके दोन वेळा विशेष सवलतीमध्ये देऊ करण्यात आली होती.
योजनेस वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
मात्र ही पुस्तके राजहंस प्रकाशनाच्या कार्यालयातच एकत्रित पाहण्यासाठी उपलब्ध असल्याने दूरवरच्या उपनगरातील वाचकांना या योजनेचा लाभ घेता आला नव्हता. त्यामुळे आता उपनगरातील स्थानिक पुस्तक विक्रेत्यांच्या सहभागातून एकाच वेळी बारा विविध ठिकाणी फक्त साठ नव्हे तर राजहंस प्रकाशनाची तीनशेहून अधिक पुस्तके वाचकांना उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे प्रकाशन संस्थेने कळविले आहे.