जगात जेथे जेथे दक्षिण भारतीय माणून पाेहचायलाय तेथे रजनीकांतच्या अफाट व अचाट लाेकप्रियतेसह त्याचा मसालेदार तमिळ चित्रपट पाेहचलाय. त्याच चित्रपटांच्या हिंदी डब आवृत्तीमुळे ताे हिंदी चित्रपटाकडून मनाेरंजनाची अपेक्षा असलेल्या आम आदमीपर्यंतही लाेकप्रिय झाला. असे असूनही हिंदी चित्रपटातील त्याचे प्रगती पुस्तक जेमतेम काठावर उत्तीर्ण असे का बरे आहे? याचे सर्वात महत्वाचे कारण ताे हिंदी चित्रपटसृष्टीत आला तेव्हाच्या परिस्थितीत आहे. १९८२ च्या ‘अंधा कानून’ या चित्रपटातून हिंदीत आला ताे चित्रपटच एका तमिळ चित्रपटाची रिमेक हाेता. रजनी अशा रिमेक हिंदी चित्रपटाचा हीराे अशी प्रतिमा तयार झाली. त्याची एकूणच अभिनय (?) शैली पाहता ताे शत्रुघ्न सिन्हा सारखी अतिशयोक्ती करताे असे मानले गेले . असा प्रभाव जाणवणे जास्त घातक असते. त्यामुळे त्याच पठडीतील भूमिका मिळत राहतात. सर्वात महत्वाचे म्हणजे ‘अंधा कानून’मध्ये विशेष भूमिकेतील अमिताभ बच्चन जास्त भाव खाऊन गेला. रजनीच्या हिंदीतील आगमनाच्या वेळेसच जीतेन्द्रचा ‘हिम्मतवाला’पासून दक्षिणेकडचे चित्रपट हिंदीचा रंगढंग लावून बनवण्यात गती आली हाेती व तशा जवळपास सर्वच चित्रपटात जीतेन्द्र असे. अशी सुरूवात हाेऊनदेखिल एक दशकभर काळ रजनी हिंदी चित्रपटातून वावरला. त्यात सर्वाेत्तम अर्थातच मुकुल आनंद दिग्दर्शित ” हम”(१९९१) हा चित्रपट! मेहबूब स्टुडियाेत त्याच्या मुहूर्ताला हजर राहतानाच अमिताभ व गाेविंदासाेबत त्याला महत्वाची संधी मिळाल्याचे जाणवले. पण चित्रपट गाजला ताे अमिताभ व किमी काटकरच्या ‘जुम्मा चुम्मा दे दे’ या जाेशपूर्ण गाण्यामुळे! रजनीची हिंदीतील वाटचाल प्रामुख्याने दुसरा वा तिसरा नायक अशीच राहिली. त्यातला पंकज पराशर दिग्दर्शित ‘चालबाज’ महत्वाचा! हा ‘राम और श्याम’चा रिमेक (अथवा ‘सीता और गीता’चा म्हणूया) श्रीदेवीची त्यात दुहेरी भूमिका हाेती व गावरान श्रीचा ताे नायक हाेता. तर सिंगल हीराेचा त्याचा महत्वाचा चित्रपट ‘जाॅन जानी जनार्दन’. त्यात त्याची तिहेरी भूमिका हाेती. ‘उत्तर दक्षिण’, ‘गंगवा’, ‘वफादार’, ‘गैर कानूनी’, ‘बेवफाई’, ‘फूल बने अंगारे’, ‘असली नकली’ अशा अनेक मसालेदार चित्रपटातून भूमिका त्याने साकारल्या. अनेकदा तरी ताे उपलब्ध आहे म्हणून त्याला दुसरा नायक साकारायला मिळे व त्याच्यामुळे दक्षिण भारतीय प्रेक्षक लाभू शकेल असे व्यावहारिक गणितही असे. ते कितपत लाभले हे त्या चित्रपटांचे निर्मातेच जाणाे. दिलीप शंकर दिग्दर्शित आतंक ही आतंकमध्ये त्याने आमिर खानसाेबत भूमिका साकारलीय. आमिर, सलमान, शाहरूख या खान हीराेंचे प्रस्थ जसजसे वाढले तशी रजनीकांतची हिंदी चित्रपटसृष्टीची गरज कमी कमी हाेत गेली. मग त्याचे ‘दलपती’सारखे चित्रपट हिंदीत डब हाेऊन यायचा प्रवाह वाढू लागला. हिंदीतील त्याच्या वाटचालीत एकदा त्याचा मराठी चित्रपटसृष्टीशी संबंध आला. पुरूषाेत्तम बेर्डे दिग्दर्शित ‘एक फुल चार हाफ’ या मराठी चित्रपटाचा रजनीकांतच्या हस्ते गाेरेगावच्या फिल्मीस्तान स्टुडियाेत मुहूर्त झाला. त्यात लक्ष्मीकांत बेर्डे व प्रिया अरूण यांच्या प्रमुख भूमिका हाेत्या. किमी काटकरही विशेष भूमिकेत असल्याने ती मुहूर्ताला हजर राहणे स्वाभाविक हाेते. पण अगदी अनपेक्षितपणे रजनीकांत आल्याने तत्क्षणी मला तरी आश्चर्याचा धक्का बसला तसा धक्का ताे हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या वाटचालीत कधी देऊ शकला असता तर ताे हिंदीत काठावरच उत्तीर्ण झाला नसता. त्याचे व्यक्तिमत्व व शैली तमिळ चित्रपटाना जास्तच साजेसे आहेच म्हणा. ताे याेग जुळला व त्याने आश्चर्य वाटावे इतपत केवढी तरी माेठी झेप घेतलीय…