दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी एकदा ठरवले की ते बदलण्याची हिंमत कोणातही नाही असेच अनेकदा होते. पण प्रत्येक गोष्टीला अपवाद असतात त्याप्रमाणे रजनीकांत यांच्याबाबतीतही नुकतेच घडले असे म्हणावे लागेल.

एका आवास योजनेच्या उदघाटनासाठी श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या रजनीकांत यांना तामिळ संघटनांच्या तीव्र विरोधांमुळे आपला दौरा रद्द करावा लागला. एका न्यूज एजंसीने दिलेल्या माहितीनुसार रजनीकांत यांना श्रीलंकेच्या दौऱ्याबाबत पुनः विचार करण्याची विनंती काही तामिळ संघटनांनी केली होती. रजनीकांत यांनी संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन शेवटी हा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

रजनीकांत यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे आपले मत व्यक्त केले. मी तामिळ संघटनांच्या सल्ल्यानुसारच दौरा रद्द केला आहे. त्यांनी मला विनम्रतापूर्वक दौरा रद्द करण्यास सांगितले होते. वास्तविक मला कोणी सल्ला दिला तर लगेचच मी त्यास होकार देत नाही. परंतु मी संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ९ एप्रिल रोजी रजनीकांत दोन दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यावर जाणार होते. या ठिकाणी ते १५० हून अधिक विस्थापित तामिळी लोकांच्या घरकुलांचे उदघाटन करणार होते. लिबरेशन पॅन्थर पार्टी म्हणजेच विदुथालाई तिरुथैगल काचीच्या (वीसीके) कार्यकर्त्यांनी रजनीकांत यांना जर ते श्रीलंकेला गेले तर मोठ्या प्रमाणात स्थानिक तामिळ समुदाय नाराज होऊ शकतो असा सल्ला दिला होता.

जर रजनीकांत श्रीलंका दौऱ्यावर गेले असते तर श्रीलंकेतील तामिळ लोकांची स्थिती पूर्वपदावर आली आहे असे वाटले असते. पण, २००९ पासून विस्थापित तामिळ लोकांच्या जीवनात कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही. ते रजनीकांत यांचा वापर करून जगाला चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच आम्ही रजनीकांत यांना त्यांच्या दौऱ्याबाबत फेरविचार करण्याचा सल्ला दिला होता, असे वीसीकेने स्पष्ट केले.