सिनेसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना १ एप्रिल रोजी जाहीर झाला. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रजनीकांत यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव केला जाणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर चाहत्यांनी रजनीकांत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. आता रजनीकांत यांनी एक पत्र लिहिले आहे.

रजनीकांत यांनी या पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, तामिळनाडू सरकार आणि चित्रपटसृष्टीमधील अनेक कलाकारांचे आभार मानले आहेत. दरम्यान रजनीकांत यांनी या पत्रात एका बस चालकाचा उल्लेख केला असून त्यांच्या यशाचे संपूर्ण श्रेय दिले आहे.

सोशल मीडियावर पत्र लिहित रजनीकांत म्हणाले, ‘मी हा पुरस्कार माझा मित्र राज बहादुरला समर्पित करतो. त्यानेच माझ्यामधील कौशल्य ओळखले आणि त्याच्यामुळे मला अनेक संधी मिळाल्या. मी माझे भाऊ सत्यनारायण राव यांचे देखील आभार मानतो. मला अभिनेता बनण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. माझे गुरु भालचंद्र ज्यांनी मला अभिनय करण्यास शिकवले त्यांचे देखील आभार.’

आणखी वाचा: बस कंडक्टर ते सुपरस्टार; रजनीकांत यांचा प्रेरणादायी प्रवास

रजनीकांत यांनी त्यांच्या पत्रामध्ये राज बहादुर यांचे आभार मानले हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. राज बहादुर हे मोठे सेलिब्रिटी नसून एक बस चालक आहेत. ज्यांनी रजनीकांत यांना करिअरच्या सुरुवातीली मदत केली होती. पत्रामधील त्यांचा उल्लेख पाहून रजनीकांत आज देखील त्यांनी केलेली मदत विसरले नसल्याचे दिसत आहे.

आणखी वाचा : राज ठाकरेंनाही झाली रजनीकांत जोक्सची आठवण, फाळके पुरस्काराच्या घोषणेनंतर म्हणतात..

रजनीकांत यांच्या या पुरस्काराचा तामिळनाडू निवडणुकीशी संबंध लावला जात होता. अशीच शंका पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आली होती. त्यावरून प्रकाश जावडेकर यांना संताप अनावर झाला. त्यांनी या प्रश्नावरून लागलीच सुनावलंही. “हा पुरस्कार सिनेसृष्टीशी संबंधित आहे. पाच जणांच्या निवड समितीने एकमताने रजनीकांत यांच्या नावाची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. यात राजकारण कोठून आलं? प्रश्न नीट विचारले पाहिजेत,” असं जावडेकर यांनी सुनावलं.