करोना व्हायरसमुळे देशातील ३० राज्यांमध्ये लॉकडाउन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद आहे. देशात ही स्थिती ३१ मार्चपर्यंत कायम राहणार आहे. ट्रेन, बस सेवा बंद असल्यामुळे दैनंदिन रोजंदारीवर काम करणाऱ्यांचे हाल होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये अनेक चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे आता कलाकार देखील सेटवर काम करणाऱ्या लोकांच्या मदतीस धावून आले आहे. या यादीतील एक नाव म्हणजे सुपरस्टार रजनीकांत.

तामिळ सुपरस्टार रजनीकांतने फिल्म एम्प्लॉयीज फेडरेशन ऑफ साऊथ इंडियाला ५० लाख रुपयांची मदत केल्याचे समोर आले आहे. तर दुसरीकडे, तमिळ स्टार स्टारिया आणि कार्ती यांनी फिल्म एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ साउथ इंडियाच्या कामगारांना १० लाख रुपयांची मदत केली आहे. करोना व्हारसमुळे सध्या सेटवर काम करणाऱ्या लोकांना घरी बसावे लागले आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी रजीकांतने मदतीचा हाथ पुढे केला आहे.

‘पिंकविला’ने दिलेल्या वृत्तानुसार १६ मार्च रोजी फिल्म एम्प्लॉयीज फेडरेशन ऑफ साऊथ इंडियाने फिल्म इंडस्ट्री बंद ठेवणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर तेथे रोजंदारी करणाऱ्या लोकांसाठी समस्या निर्माण झाली होती. त्यांना मदत करण्यासाठी रजनीकांतने हे पाऊल उचलले आहे.

बॉलिवूड कलाकारांनी देखील मदतीचा हात पुढे केल्याचे म्हटले जाते. या यादीमध्ये सोनम कपूर, जावेद अख्तर, मधुर भंडारकर, सलीम मर्चेंट, संजय गुप्ता, विवेक अग्निहोत्री आणि करणवीर वोहरा यांची नावे आहेत. यांनी बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये सेटवरील मेकअप आर्टिस्ट, ड्रायवर, स्पॉटबॉय, लाइट मॅन, कॅमेरा आर्टिस्ट, सेट डिझायनर अशा अनेक लोकांना मदत केली आहे.