रजनीकांत हे फक्त दक्षिणेतलेच नाही तर भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार म्हणून ओळखले जातात. कोणासाठी ते ‘थलायवा’ तर कोणासाठी ते देव आहेत. त्यांची फॅन फॉलोईंग खूप मोठी आहे. फक्त दक्षिणेतच नाही तर अगदी जपानमध्येही रजनीकांत यांना मानणारा मोठा वर्ग आहे. सुपरस्टार असूनही त्याचं साध राहणं अनेकांना आवडतं. त्यांची हिच साधी राहणी त्यांना इतर कलाकारांपेक्षा खूपच वेगळी ठरवते.

रजनीकांत यांचे ट्विटर या मायक्रो ब्लॉगिंगसाईटवरदेखील मोठे फॉलोअर्स आहेत. २०१३ मध्ये रजनीकांत ट्विटरवर आले. विशेष म्हणजे सोशल मीडियावर फारसे सक्रिय नसणाऱ्या रजनीकांत यांचे ५१ लाखांहून अधिक फॉलोअर्स ट्विटरवर आहेत. राजकारणात आल्यावर मात्र रजनीकांत बऱ्यापैकी सक्रिय झाले. मात्र इतर कलाकारांच्या तुलनेत ट्विटवर सक्रिय असण्याचं त्यांचं प्रमाण खूपच कमी आहे. ट्विटरवर ते फक्त २४ जणांना फॉलो करतात. यात महानायक अमिताभ बच्चन या केवळ एकाच बॉलिवूड कलाकाराचा समावेश आहे. याव्यतिरिक्त मुलगी सौंदर्या, ऐश्वर्या, जावई धनुष, संगीतकार ए.आर. रेहमान, संगीतकार अनिरुद्ध रवीचंद्र आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही फॉलो करतात. या यादीत काही वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनींच्या अधिकृत ट्विटर हँडलचाही समावेश आहे.

अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांनी ‘गिरफ्तार’, ‘अंधा कानून’ यांसारख्या चित्रपटात काम केलं आहे. रजनीकांत यांच्या ६८ व्या वाढदिवसानिमित्तानं अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर त्यांना शुभेच्छा दिल्या. ‘तुम्ही मला नेहमीच प्रेरणा देतात’ असं लिहित रजनीकांत यांनीदेखील शुभेच्छांचा स्वीकार केला आहे.