अभिनेता रजनीकांत याच्या चित्रपटाला प्रमोशनची गरजच नाही. प्रेक्षक केवळ त्याच्या नावामुळे चित्रपट बघायला येतात. पण त्याच्या आगामी ‘कबाली’ या तमीळ चित्रपटाचे हटके प्रमोशन करण्यात आले आहे. त्यासाठी चक्क एअर एशियाच्या एका विमानाच्या बाह्यांगावर चित्रपटाचे पोस्टर रंगविण्यात आले आहे. या पोस्टरवर मोठ्या आकारामध्ये रजनीकांतचा चित्रपटातील लूक आणि चित्रपटाचे नाव रंगविण्यात आले आहे. या हटके प्रमोशनमुळे विमानतळावरील अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
कबाली येत्या १५ जुलैला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार प्रदर्शनाची तारीख कदाचित २२ जुलैपर्यंत पुढेही नेली जाऊ शकते. चित्रपटाच्या पहिल्या शोसाठी रजनीकांतच्या काही चाहत्यांना या विशेष विमानातून बेंगळुरूतून चेन्नईला नेण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्यांना विमानामध्ये खास कबाली मेन्यू सर्व्ह करण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे. याच चित्रपटातील नेरूपुडा हे गाणे चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहे.