दाक्षिणात्य सिनेमांचे सुपरस्टार रजनीकांत गेल्या काही दिवसांपासून आध्यात्मिक यात्रेवर आहेत. सुपरस्टारच्या बिरूदासोबतच आता ते राजकारणीही झाले आहेत. आयुष्यातील या नव्या वळणाबद्दल बोलताना रजनीकांत यांनी सांगितले की, आता त्यांना पूर्वीसारखं मुक्त वाटत नाही. तुरूंगात असल्यासारखं त्यांचं आयुष्य झालं आहे. १५ दिवसांच्या या यात्रेत रजनीकांत ऋषीकेश येथील दयानंद सरस्वती आश्रमात थांबले होते.

इंडिया टुडेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार रजनीकांत म्हणाले की, ‘हा प्रवास मला एक वेगळीच ऊर्जा देऊन जातो. मी १९९५ पासून येथे येतो. पण गेल्या काही वर्षांमध्ये कामाच्या व्यापामुळे शक्य झालं नाही. आता गंगा किनारी काही दिवस घालवून मी स्वतःला मुक्त करु इच्छितो. सध्या मला राजकारणी लोकांमध्ये न राहता योग आणि चांगल्या लोकांच्या सहवासात राहायचे आहे. आधी माझं आयुष्य बऱ्याचप्रमाणात खासगी होतं पण आता आयुष्य पूर्वीसारखं राहिलं नाही. मला माझ्या जुन्या दिवसांची फार आठवण येते. आता मी जे आयुष्य जगतोय त्यात मला फारच बंदिस्त वाटतं. पण सेलिब्रिटी असल्याची किंमत तर तुम्हाला मोजावी लागतेच. मीही ती किंमत मोजतो आहे.’

रजनीकांत दरवर्षी हिमालयात जाऊन आध्यात्मिक गुरुंच्या सहवासात राहतात. त्यांच्या या यात्रेचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात रजनीकांत यांनी त्यांच्या राजकीय प्रवेशाची घोषणा केली होती. एका भाषणात बोलताना रजनीकांत म्हणाले होते की, तामिळनाडूमध्ये नेतृत्वाचा अभाव आहे. त्यामुळे राज्याला नेतृत्व देण्यासाठी त्यांनी नवीन राजकीय पक्षाची स्थापना केली आहे. रजनीकांत यांच्यासोबत अभिनेते कमल हसन यांनीही त्यांचा मक्कल निधि मैयम या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली आहे.