21 January 2018

News Flash

रजनीकांत साकारणार हाजी मस्तानची भूमिका?

मस्तान हैदर मिर्झा हा गँगस्टर हाजी मस्तान, बावा आणि सुलतान मिर्झा या नावांनी प्रसिद्ध होता.

मुंबई | Updated: April 21, 2017 7:47 PM

सुपरस्टार रजनीकांत

सुपरस्टार रजनीकांत हे दिग्दर्शक रणजीथच्या आगामी चित्रपटात पुन्हा एकदा गँगस्टरच्या भूमिकेत झळकणार असल्याची चर्चा सध्या सिनेवर्तुळात सुरु आहे. मात्र, यावेळची त्यांची भूमिका एका खऱ्या गँगस्टरवर आधारित आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईवर आधारित या चित्रपटाची कथा गँगस्टर हाजी मस्तानच्या आयुष्यावर आधारित आहे.

मस्तान हैदर मिर्झा हा गँगस्टर प्रामुख्याने हाजी मस्तान, बावा आणि सुलतान मिर्झा या नावांनी प्रसिद्ध होता. तमिळ मुस्लिम असलेला हाजी मस्तान आठ वर्षांचा असताना त्याच्या वडिलांसह मुंबईत स्थलांतरित झाला होता. तो अतिशय अस्खलितपणे तमिळ बोलायचा. स्मगलिंग आणि रिअल इस्टेट व्यवसायात तरबेज असलेल्या गँगस्टर करिम लाला आणि वरदराजन मुदलियारची त्याला मुंबईत साथ मिळाली. कायद्याच्या दृष्टीने गुन्हेगार असलेला हाजी मस्तान हा मुंबईतील गरिबांसाठी एक सेलिब्रिटी होता. त्याने अंडरवर्ल्ड जगतात जवळपास २० वर्षे वर्चस्व गाजवले होते. तसेच, तो दाऊद इब्राहिमचा गुरुदेखील होता.

याआधी अभिनेता अजय देवगण याने २०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ या चित्रपटात हाजी मस्तानची भूमिका साकारली होती. पण, आता येऊ घातलेल्या हाजी मस्तानवरील नव्या चित्रपटात रजनीकांत हे भूमिका साकारणार की नाही याबद्दलचे कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेले नाही. ‘बाशा’नंतर जवळपास दोन दशकानंतर रजनीकांत यांनी गेल्यावर्षी आलेल्या ‘कबाली’ चित्रपटात गँगस्टरची भूमिका साकारली होती. दरम्यान, हाजी मस्तानवरील चित्रपटाचे काम पुढच्या महिन्यात सुरु होणार असल्याचे कळते. दिग्दर्शकाने अद्याप चित्रपटातील सर्व कलाकरांची नावे जाहीर केली नसली तरी अभिनेत्री विद्या बालन यात प्रमुख भूमिकेत दिसण्याची शक्यता वर्तविली जातेय. ‘वंडरबार फिल्म्स’ या धनुषच्या प्रॉडक्शन बॅनरअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे.

First Published on April 21, 2017 7:47 pm

Web Title: rajinikanth to play tamil don mirza haji mastan
  1. No Comments.