इफ्फी महोत्सवात रजनीकांत यांना ‘आयकॉन ऑफ द गोल्डन ज्युबली’ पुरस्काराने अमिताभ बच्चन यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तर रजनीकांत यांनी अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला. याप्रसंगी रजनीकांत यांनी बिग बींच्या पाया पडत कृतज्ञता व्यक्त केली. तर बिग बींनी रजनीकांत यांची गळाभेट घेतली. इफ्फीच्या निमित्ताने चित्रपटसृष्टीतील दोन मोठ्या कलाकारांना एकाच व्यासपीठावर पाहणे चाहत्यांसाठी पर्वणीच होती. रजनीकांत हे माझ्या कुटुंबातील सदस्यांसारखे असून दररोज आपल्या कामातून प्रेरणा देत असल्याचे उद्गार बिग बींनी काढले.

अनेकदा स्टारडम किंवा एकमेकांमधील मतभेद यांमुळे कलाकारांमधील नात्यांमध्ये कटुता निर्माण होते. मात्र, रजनीकांत व अमिताभ बच्चन या दोन महानायकांनी इफ्फीच्या व्यासपीठावर एकमेकांविषयी आदर, प्रेम व्यक्त करत एक चांगले उदाहरण इतर कलाकारांसमोर सादर केले. रजनीकांत जेव्हा कधी अमिताभ बच्चन यांना भेटतात तेव्हा त्यांच्या पाया पडून आपल्या संस्कारांचा आदर्श चाहत्यांसमोर ठेवतात.

रजनीकांत यांनी त्यांना मिळालेला पुरस्कार चाहत्यांना अर्पण करत असल्याचे भावूक उद्गार काढले. आतापर्यंतच्या कारकिर्दीत सहकार्य करणारे निर्माते, दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांचेही त्यांनी आभार मानले.

७७ वर्षांचे बिग बी व ६८ वर्षांचे रजनीकांत आजही चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. कामाप्रती असलेला प्रामाणिकपणा व नम्रता ही या दोघांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये आहेत. रजनीकांत हे बिग बींपेक्षा वयाने ९ वर्षांनी लहान आहेत. बिग बींना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते तर रजनीकांत यांना दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील चाहते देव मानतात. बिग बींनी चित्रपटसृष्टीत ५० वर्षे पूर्ण केली असून रजनीकांत यांनी ४५ वर्षे पूर्ण केली आहेत. सोशल मीडियावरही या दोन्ही कलाकारांचे कोट्यवधी फॉलोअर्स आहेत.