‘२.०’ या चित्रपटाच्या फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यासाठीच्या कार्यक्रमाला दिमाखात सुरुवात झाली आणि प्रश्नोत्तरांच्या सत्राला सुरुवात होणार इतक्यातच ‘२.०’ या चित्रपटाच्या टीममधील एका व्यक्तीने अक्षय कुमारकडे धाव घेतली आणि त्याच्या कानात तो काहीतरी कुजबुजला. त्या टीम मेंबरने प्रवेशद्वाराकडेही बोट दाखवत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला. अभिनेता अक्षय कुमारही तातडीने त्याच्या खुर्चीवरुन उठला आणि त्याने प्रवेशद्वाराकडे धाव घेतली. हा सारा गोंधळ आणि धावाधाव होण्याचे कारण होते अभिनेता सलमान खान.

एकाच ठिकाणी, एकाच कार्यक्रमात तीन प्रसिद्ध कलाकार एकत्र येण्याचा योगच जणू जुळून आला होता. ‘२.०’ या चित्रपटाच्या फर्स्ट लूकच्या प्रदर्शनासाठी आयोजित कार्यक्रमामध्ये सुपरस्टार रजनीकांत, अभिनेता अक्षय कुमार यांनी हजेरी लावली होती. पण, आमंत्रितांच्या यादीमध्ये नसतानाही अभिनेता सलमान खानने हजेरी लावत उपस्थितांना आश्चर्याचा धक्काच दिला. सलमान येताच खिलाडी कुमारने त्याचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. खिलाडी कुमारची भेट घेतल्यानंतर सलमान सुपरस्टार रजनीकांत यांची भेट घेण्यासाठी पुढे सरसावला. त्यानंतर कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धूरा सांभाळणाऱ्या करण जोहरने सलमानला व्यासपीठावर बोलावले आणि त्यानंतर सलमान रजनीकांत यांच्याबद्दल बोलू लागला.

‘मला फक्त रजनी गुरुंना पाहायचे होते. ते एक व्यक्ति म्हणून खूप चांगले आहेत. मी त्यांचा फार आदर करतो. या कार्यक्रमासाठी मी आमंत्रित नव्हतो. पण, या कार्यक्रमाबद्दल मला कळले आणि मी इथे आलो’, असे म्हणत सलमानने उपस्थितांसमोर त्याच्या आठवणीही शेअर केल्या. ‘एकदा आम्ही (मी आणि रजनी गुरु) एकत्र चित्रीकरण करत होतो. त्यावेळी मी बाथरुममध्ये गेलो तेव्हा रजनी गुरु तिथे सिगारेट फेकत होते आणि ती तोंडाने पकडत होते. मी त्यांना विचारले की ‘तुम्ही काय करत आहात? त्यावर ते म्हणाले ‘बाहेर खुप हवा आहे. त्यामुळे मी हे इथे करतो आहे’. तो कार्यक्रम एका खुल्या सेटवर होत होता. त्यामुळे मी विंगेत गेलो कारण, रजनी गुरु खरंच सिगारेट एका झटक्यात त्यांच्या तोंडाने सिगारेट पकडतात का हे मला पाहायचे होते आणि खरंच त्यांनी ती एका झटक्यातच तोंडाने पकडली’, असे म्हणत सलमानने त्याची रजनी गुरुंसोबतची आठवण सांगितली. दरम्यान, सलमानला आमंत्रण नसतानाही तो या कार्यक्रमाला आला होता, पण, या कार्यक्रमाला अभिनेता शाहरुख खान मात्र गैरहजर होता ही लक्षात घेण्यासारखी बाब आहे.

या कार्यक्रमामध्ये सलमानने अभिनेता अक्षय कुमारच्या कामाचीही प्रशंसा केली. यासोबतच त्याने ‘२.०’ या चित्रपटाच्या फर्स्ट लूकची प्रशंसा करत हा चित्रपट पाहण्यासाठी तो उत्सुक असल्याचेही सांगितले.
विशेष म्हणजे, ‘२.०’ हा चित्रपट आतापर्यंतचा बिग बजेट चित्रपट ठरणार असल्याची चर्चा आहे. तब्बल ३५० कोटी खर्चून चित्रपटाची निर्मिती केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. रजनीकांत आणि अक्षय यांच्यासोबतच चित्रपटात अॅमी जॅक्सन, सुधांशू पांडे आणि आदिल हुसैन यांच्याही भूमिका आहेत. ऑस्कर विजेते सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांनी या चित्रपटाता संगीत दिले आहे.