रजनीकांत तो सिर्फ नाम ही काफी है.. केवळ रजनीकांत या नावावर चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या रांगा लागतात. आता त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. त्यांचा २० वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला एक चित्रपट आता पुन्हा पुनर्प्रदर्शित करण्यात येणार आहे.

रजनीकांत यांचा २० वर्षांपूर्वी आलेला ब्लॉकबस्टर ‘बाशा’ हा चित्रपट डिजिटलायझेशन करून पुनर्प्रदर्शित करण्यात येतोय. सुपरस्टार रजनीकांत यांच्या ६६व्या वाढदिवसाच्या औचित्यावर १२ डिसेंबर २०१६ रोजी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल. ९० च्या दशकात प्रदर्शित झालेला ‘बाशा’ हा चित्रपट तेव्हा ट्रेण्डसेटर झाला होता. या चित्रपटात रजनीकांत यांनी प्रथमच खलनायकी भूमिकेत असलेला हिरो साकारला होता. १९९५ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट तब्बल ३६८ दिवस चालला होता. तेव्हाचे सर्व रेकॉर्ड मोडित काढत हा चित्रपट तेव्हा हिट झालेला. चित्रपटात रजनीकांत यांनी हिंसक भूतकाळ असलेल्या रिक्षा चालकाची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे रजनीकांत हे एका रात्रीत तामिळनाडूतील रिक्षा चालकांसाठी सुपरस्टार झाले होते.

सध्या रजनीकांत हे त्यांच्या आगामी ‘२.०’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. त्यांच्या सुपरहिट ‘एन्थिरन’ या चित्रपटाचा हा सिक्वल आहे. शंकर दिग्दर्शित या चित्रपट अक्षय कुमार हा मुख्य खलनायकाची भूमिका साकारणार आहे. अभिनेत्री अॅमी जॅकसन यात मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारणार आहे. ‘२.०’ चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होईल.