‘सुपरस्टार रजनीकांत’ची भूमिका असलेला ‘कबाली’ चित्रपट आता जवळपास सगळीकडेच चर्चेत आहे. पुद्दुचेरी प्रशासनाने वाटलेल्या चित्रपटाच्या मोफत तिकीटांपासून ते एअर एशिया या एअरलाइन्सच्या विमानावर ‘कबाली’चा पोस्टर रंगविण्यापर्यंत विविध गोष्टी आतापर्यंत करण्यात आल्या. भारतातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी कबाली हा एक चित्रपट आहे. पण, केवळ भारतापुरताच या चित्रपटाची आता प्रतिक्षा राहिली नसून अमेरिकेतील प्रेक्षकही कबाली पाहण्यासाठी बरेचं उत्सुक झाले आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, २२ जुलै प्रदर्शित होणा-या रजनीकांत यांच्या कबाली चित्रपटाची अमेरिकेत प्रदर्शनपूर्व तिकीटे विकण्यात आली. विशेष म्हणजे केवळ दोन तासांतच ही तिकीटे विकली गेली. रजनीकांत यांच्या चाळीस वर्षांच्या कारकिर्दीतील हा १५९वा चित्रपट असून जगभरात हा चित्रपट प्रदर्शित होईल. या अफलातून कलाकाराचे जपानमध्ये मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. तमिळ आणि तेलगू भाषेतील हा चित्रपट ४०० स्क्रिन्सवर दाखविण्यात येईल, असे सिनेगॅलेक्सीचे मधू गर्लापती यांनी आयएएनएस वृत्तसंस्थेस सांगितले. हा चित्रपट हिंदी भाषेत डब करण्यात आला आहे.
पीए. राजनीथ दिग्दर्शित कबाली या चित्रपटात रजनीकांत, राधिका आपटे, किशोर, कलैरासन दिनेश, धानसिक्का, विन्स्टन चाओ यांच्या भूमिका आहेत. यात रजनीकांत हे मलेशियात तमिळांसाठी लढणा-या डॉनच्या भूमिकेत दिसतील. कबालीच्या प्रदर्शनापूर्वी त्याच्या पायरेटेड कॉपी निघू नये यासाठी निर्माते बरेच प्रयत्न करत आहेत.