‘न्यूटन’ हे नाव ऐकताच तुम्हाला सर आयझॅक न्यूटन यांचा सिद्धांत आठवला असेल. मात्र अभिनेता राजकुमार राव याच्या आगामी ‘न्यूटन’ चित्रपटाचा ट्रेलर तुमच्यासमोर एक वेगळंच चित्र निर्माण करेल. राजकुमार आणखी एका दमदार भूमिकेत या चित्रपटातून तुमच्या भेटीला येतोय. या चित्रपटातील न्यूटनचा मात्र एक साधासोपा विचार आहे, तो म्हणजे, ‘तुम्ही काहीच बदल केला नाही, तर काहीच बदलणार नाही.’ चित्रपटातील न्यूटन परिस्थितीसमोर न झुकता त्याच्या मते जे योग्य आहे, किंबहुना देशाच्या नियमांप्रमाणे जे योग्य आहे तेच करताना दिसतो.

२ मिनिटे ५६ सेकंदाच्या या ट्रेलरच्या सुरुवातीलाच राजकुमारच्या भूमिकेची ओळख होते. लग्नासाठी पाहायला गेलेली मुलगी फक्त १६ वर्षांची आहे समजल्यावर न्यूटन तेथून निघतो. त्यानंतर नक्षलवादी भागात इलेक्शन ड्युटीवर नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्याचं आयुष्यच बदलतं.

वाचा : …म्हणून दिलीप कुमारांचा ऑटोग्राफ घेण्यासाठी बिग बींना लागली ४६ वर्षे

मतदानाला महत्त्व न देणाऱ्या नागरिकांसाठी या चित्रपटातून महत्त्वाचा संदेश देण्यात आलाय. मत देण्याचा अधिकार नागरिकाला असून, प्रत्येक गोष्ट बदलण्याची ताकद तुमच्या मतात आहे हेच यातून सांगण्याचा प्रयत्न केलाय. ‘इरॉस नाऊ’च्या अधिकृत यूट्यूब चॅनलने हा ट्रेलर अपलोड केलाय. राजकुमार रावसोबतच संजय मिश्रा आणि पंकज त्रिपाठी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अमित मसूरकर दिग्दर्शित हा चित्रपट २२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.