करोना विषाणूच्या तडाख्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे जवळपास लाखभर लोक करोनातून पूर्णपणे बरे झाले असल्याची माहिती आहे. त्यामुळे योग्य ती काळजी आणि उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, यावर साऱ्यांचा विश्वास असून भारतातही याबाबत जनजागृती केली जात आहे. या कसोटीच्या काळात रोजंदारीवर म्हणजेच हातावर पोट असलेल्या कामगारांवर वाईट वेळ आली आहे. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी आता अभिनेता राजकुमार राव पुढे सरसावला आहे.

हातावर पोट असणाऱ्यांवर सध्या करोनाच्या तडाख्यामुळे उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन राजकुमार रावने पुढाकार घेतला आहे. राजकुमारने रोजंदारी कामगारांना आर्थिक मदत केली आहे. त्याचप्रमाणे इतरांनाही त्यांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे.

आणखी वाचा : करोनाच्या भीतीने मंदिरा बेदीला आला पॅनिक अटॅक

भारतात करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ७०० च्या पुढे गेली आहे. गुरुवारी देशभरात करोना व्हायरसमुळे सात जणांचा मृत्यू झाला. संपूर्ण देशात करोनामुळे आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे.