अभिनेता राजकुमार राव कोणतीही भूमिका करतो त्यात तो आपले १०० टक्के देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यासाठी प्रत्येक भूमिका ही वेगळी आणि खास असते. नेहमीच हटके भूमिका करण्याला प्राधान्य देणाऱ्या राजकुमारने दिग्दर्शक हंसल मेहता यांच्या ‘बोस-डेड/अलाइव’ या वेब सीरिजमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची व्यक्तिरेखा साकारली. लकरच ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही व्यक्तिरेखा साकारताना त्याने सुभाषचंद्रांच्या व्यक्तिरेखेशी जास्तीत जास्त जवळ जाता यावे म्हणून बरीच मेहनत घेतली. तो कित्येक महिने डाएटवर होता आणि सुभाषचंद्रांना होते तसे स्वतःचे त्याने अर्धे टक्कलही केले. एकीकडे डाएट करत असताना तो या भूमिकेसाठी व्यसनाच्या आहारीही गेला होता.

सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर शिल्पाने तो व्हिडिओ केला डिलीट

सुभाषचंद्र यांना धूम्रपानाची सवय होती. सिगारेट आणि सुभाषचंद्र असे जणू समीकरच झाले होते. राजकुमारनेही भूमिकेत अधिक जिवंतपणा आणण्यासाठी सिगारेट ओढण्यास सुरुवात केली. एक-दोन सिगारेटवरुन सुरू झालेली ही सवय नंतर राजकुमारला आहारीच घेऊन गेली. भूमिकेसाठी सुरू केलेल्या धुम्रपानाचे त्याला व्यसन जडले होते. ‘बोस-डेड/अलाइव’ या वेबसीरिजचे क्रिएटीव्ह प्रोड्युसर म्हणाले की, ‘राजकुमारला कोणतेच व्यसन नाही. तो आपल्या फिटनेसच्या बाबतीत सजग आहे. योग्य खाणे आणि उत्तम झोप याचे तो पालन करतो. पण त्याने व्यक्तिरेखेसाठी धूम्रपानही करायला सुरूवात केली होती. त्यामुळे लडाखमध्ये चित्रीकरणादरम्यान राजकुमारला श्वास घेण्यास अडचण येत होती. या भूमिकेसाठी त्याने धूम्रपान तर सुरू केलेच शिवाय ११ किलो वजनही वाढवले होते.’

ही वेब सीरिज देशातील सर्वात मोठ्या प्रश्नांच्या अवतीभोवती फिरणारी आहे. वेबसीरिजमध्ये सुभाषचंद्र बोस यांचा एक तरुण ते नेताजी होण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. तसेच ते देशातील सर्वात लोकप्रिय नेते कसे झाले याच्यावरही प्रकाश टाकण्यात येणार आहे. या सीरिजच्या ट्रेलरमध्ये नेताजींचे प्रसिद्ध घोषवाक्य ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दुंगा’ याचा समावेश करण्यात आला आहे. राजकुमारच्या चाहत्यांना या वेब सीरिजची उत्सुकता लागून राहिली आहे हे मात्र नक्की.