‘अल्ट  बालाजी’ या आपल्या नव्या डिजिटल वाहिनीसाठी निर्माती एकता कपूरने जय्यत तयारी केली आहे. ‘सिटीलाईट’, ‘शाहीद’ आणि ‘अलिगढ’सारखे वेगळे आणि पुरस्कार विजेते चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शक हंसल मेहता आणि अभिनेता राजकुमार राव या जोडगोळीला एकताने एकत्र आणले आहे. ही जोडी पहिल्यांदाच या नव्या वाहिनीसाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा चरित्रपट घेऊन येणार आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे व्यक्तिमत्त्व, त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या पद्धतीने आझाद हिंद सेना उभी केली त्याची कथा आजही अभिमान वाटावी अशीच आहे. आणि त्यामुळे ती लोकांसमोर येणं गरजेचं आहे असं वाटतं. नेताजींचं अचानक गायब होणं हे आजही एक गूढ राहिलं आहे. त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा मागोवा घेताना, संदर्भ तपासताना त्यांची कथा लोकांसमोर आलीच पाहिजे ही भावना अधिकाधिक दृढ होत गेली. त्यासाठी ‘अल्ट बालाजी’ हे योग्य व्यासपीठ आहे, अशा शब्दांत एकता कपूरने आपला या मालिकेच्या निर्मितीमागचा उद्देश स्पष्ट केला. अशा विषयासाठी हंसल मेहता आणि राजकुमार राव या जोडगोळीइतकं परफेक्ट कोणी असू शकत नाही. त्या दोघांनाही एकमेकांकडून चांगल्यातलं चांगलं काम करून घेणं माहिती आहे. त्यामुळे त्यांच्याकडून चांगलंच हाती लागेल, असा विश्वास तिने व्यक्त केला.

तर एक कंटाळवाणे, निरस, लांबलचक अशा चरित्रस्वरूपात नेताजींची कथा लोकांसमोर आणण्यात आपल्याला अजिबात रस नसल्याचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक हंसल मेहता यांनी स्पष्ट केलं. ही अशा एका माणसाची कथा आहे, ज्याचा वेग आणि पस दोन्ही मोठे होते. त्यांच्या एका कथेत अनेक रहस्यं, अनेक गोष्टी दडलेल्या आहेत. ही वेब मालिका थरारपटांच्या धाटणीने रंगवण्यात येणार आहे. जेणेकरून तुम्हाला त्यांच्या आयुष्याची माहितीही मिळेल, पण ती पाहताना तुम्ही खुर्ची सोडणार नाही. नेताजी बोस हे जणू समकालीन हिरो आहेत, काळाशी बंड करणारं असं एक व्यक्तिमत्त्व आहे ज्याची कथा आजच्या तरुणांनाही आपलीशी वाटेल, अशा पद्धतीने नेताजींची कथा रंगवण्यात येणार असल्याचे हंसल मेहता यांनी सांगितले. आणि त्यासाठी ‘अल्ट बालाजी’सारखे व्यासपीठ नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.