थलायवा रजनीकांत यांचा ‘काला’ चित्रपट अखेर आज रिलीज झाला आहे. अनेक वाद-विवाद झाल्यानंतर चित्रपट रिलीज झाला असून चेन्नईत चित्रपटगृहाबाहेर चाहत्यांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. रजनीकांत यांचा चित्रपट म्हटलं की, त्यांच्या चाहत्यांमध्ये नेहमीच उत्साह असतो. चेन्नईतील रोहिनी चित्रपटगृहात पहाटे ४ वाजता पहिला शो ठेवण्यात आला होता. या शोसाठी चाहत्यांनी चित्रपटगृहाबाहेर तुफान गर्दी केली होती.

याआधी ‘काला’ या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. बुधवारी न्यायालायने याचिका फेटाळल्याने चित्रपटाचा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला होता.

न्या. आदर्शकुमार गोयल व न्या. अशोक भूषण यांनी चित्रपट निर्माता के. एस. राजशेखरन यांची याचिका फेटाळली. या चित्रपटाची कथा, गाणी व दृश्ये हे सगळे काम माझेच होते असा दावा त्यांनी केला होता. ‘काला’ हा चित्रपट रजनीकांत यांचा जावई अभिनेते धनुष याने निर्मिती केलेला असून, वंडरबार फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेडच्या या चित्रपटाचे दिग्दर्शक पा. रणजिथ आहेत. हा चित्रपट आधी लांबणीवर टाकण्यात आला होता. अखेर आज चित्रपट प्रदर्शित झाला आहे.