सुपरस्टार रजनिकांत यांचा काला हा सिनेमा प्रदर्शनापूर्वीच ट्रेंडमध्ये येऊ लागला आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले होते. रजनीकांत एका खुर्चीवर बसले आहेत आणि त्यांच्या बाजूला एक कुत्रा असल्याचे पोस्टरमध्ये दिसते. तुम्हाला माहित आहे का हा कुत्रा विकत घेण्यासाठी रजनीकांत यांचे कट्टर चाहते २ कोटी रुपयेही मोजायला तयार आहेत. या कुत्र्याचे नाव मणी आहे. प्रोफेशनल डॉग ट्रेनर सिमोनने सांगितल्यानुसार, या कुत्र्याला विकत घेण्यासाठी मलेशियाहून मागणी आली आहे. सिमोन म्हणाला की, ‘काही लोकांनी मणीसाठी १ ते २ कोटी रुपये देण्याचीही तयारी दाखवली आहे. पण आम्ही त्याला न विकण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही त्याचा एखाद्या मुलाप्रमाणे सांभाळ करत आहोत.’
सिमोन पुढे म्हणाला की, ‘कोणी आपल्या मुलाला असं विकतं का? मला तरी ते शक्य नाही. म्हणूनच मी रजनीकांत यांच्या चाहत्यांनी दिलेल्या ऑफर नाकारल्या.’ यावेळी सिमोनने मणी आणि रजनीकांत यांच्यातील नात्याबद्दलही भाष्य केले. ‘रजनी सर त्याला दररोज बिस्किटाचे एक पाकिट खायला द्यायचे. अशा वागण्याने ट्रेनरचं काम सोपं होऊन जातं. चित्रीकरणादरम्यान त्या दोघांमध्ये चांगले नाते तयार झाले होते.’ रजनीकांत यांनी मंगळवारी फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल साइटवर पदार्पण केले. दक्षिणेकडे रजनीकांत यांना देवाप्रमाणे पूजले जाते. त्यांच्या चाहत्यांच्या मते, रजनीकांत ज्या गोष्टींना हात लावतात ते हिट होते.
रजनीकांत यांचा ‘काला’ सिनेमा पुढच्या महिन्यात २८ तारखेला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमा व्यतिरिक्त अक्षय कुमारसोबतचा ‘२.०’ हा सिनेमाही याचवर्षी प्रदर्शित होणार आहे. ‘२.०’ हा सिनेमा एप्रिलमध्येच प्रदर्शित होणार होता. पण ‘काला’च्या प्रदर्शनामुळे ‘२.०’ चे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. ‘२.०’ सिनेमातून अक्षय कुमार पहिल्यांदा नकारात्मक भूमिकेत दिसेल. सिनेमाचा ट्रेलर आणि टीझर अजूनपर्यंत प्रदर्शित करण्यात आलेला नाही. पण आतापर्यंत ‘२.०’ सिनेमाचे जे मेकिंग व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत त्याला चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 10, 2018 6:52 pm