संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावत’ चित्रपट प्रदर्शनापूर्वी पाहण्यास राजपूत करणी सेना तयार झाली असल्याची माहिती समोर येत आहे. करणी सेनेचे अध्यक्ष लोकेंद्र सिंह कालवी यांनी चिठ्ठीद्वारे भन्साळींना होकार कळवला आहे. सेन्सॉर बोर्ड आणि सुप्रीम कोर्टाने चित्रपटाला हिरवा कंदील दाखवल्यानंतरही करणी सेनेचा विरोध काही केल्या कमी होत नाही आहे. यातून मार्ग काढण्यासाठी भन्साळींनी श्री राजपूत करणी सेना आणि श्री राजपूत सभा यांना प्रदर्शनापूर्वी चित्रपट पाहण्याचे निमंत्रण दिले होते.

राणी पद्मावती आणि अलाउद्दीन खिल्जी यांच्यावर कोणताही प्रेमप्रसंग चित्रीत करण्यात आला नसल्याचा उल्लेख भन्साळींच्या चिठ्ठीत होता. इतिहासाची मोडतोड करून चित्रपटनिर्मिती केल्याचा आरोप करणी सेनेने सुरुवातीपासूनच केला आहे. त्यामुळे आता प्रदर्शनापूर्वी चित्रपट पाहिल्यानंतर करणी सेनेचा विरोध कमी होईल का, चित्रपट प्रदर्शनाचा वाद मिटेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

वाचा : आणखी एका चित्रपटाला ‘पद्मावत’चा धसका

दरम्यान, ‘पद्मावत’च्या प्रदर्शनावरील बंदी उठवण्याच्या आदेशात बदल करण्याची मागणी करत मध्यप्रदेश आणि राजस्थान सरकारने सोमवारी सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले आहे. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे. हा चित्रपट २५ जानेवारीला देशभरात प्रदर्शित होत आहे. यापूर्वी मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने राजस्थान, गुजरात, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशमध्ये या चित्रपटावरील बंदीचा त्या-त्या राज्य सरकारचा निर्णय रद्द केला होता. यानंतर पुन्हा मध्य प्रदेश आणि राजस्थान सरकार सर्वोच्च न्यायालयात पोहोचली आहे.