बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘दिल्ली ६’ या चित्रपटात अभिनेता अभिषेक बच्चन आणि सोनम कपूर मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट २००९मध्ये प्रदर्शित झाला होता. पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. हा चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर राकेश ओमप्रकाश मेहरा यांना मोठा धक्का बसला होता.

राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या जीवनावर आधारित ‘द स्ट्रेंजर इन द मिरर’ हे पुस्तक काही दिवसांपूर्वी प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. दरम्यान त्यांनी ‘दिल्ली ६’ हा चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर आत्महत्या करण्याचा विचार केला होता असे देखील म्हटले आहे.

आणखी वाचा : ‘शोले’मध्ये गब्बरच्या भूमिकेसाठी ‘या’ अभिनेत्याला होती पहिली पसंती

‘चित्रपट शुक्रवार, २० फेब्रुवारी २००९ रोजी चित्रपट प्रदर्शित झाला. रविवारपर्यंत आम्ही ४० कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे कमावले. पण सोमवारी प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये आलेच नाहीत. मी रातोरात उध्वस्त झालो’ असे राकेश ओमप्रकाश मेहरा म्हणाले.

पुढे त्यांनी म्हटले की, ‘चित्रपट फ्लॉप ठरला आणि डोक्यात आत्महत्येचे विचार येऊ लागले. मी अपयशी ठरलो हे मला मान्यच नव्हते. मी रोज मद्यपान करु लागलो होतो. मी कधीच न उठण्यासाठी झोपण्याचा प्रयत्न करत होतो. मला स्वत:ला संपवायचे होते. मी माझ्या पत्नीला आणि मुलीला खूप त्रास दिला. आमच्यामध्ये वाद सुरु झाले होते. माझे ज्यांच्यावर सर्वात जास्त प्रेम होते त्यांची काळजी करणे मी बंद केले होते.’

राकेश ओमप्रकाश मेहरा हे बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय दिग्दर्शक आहेत. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी ‘रंग दे बसंती’, ‘भाग मिल्खा भाग’, ‘मिर्जा’, ‘दिल्ली-6’ आणि ‘तूफान’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.