बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या यशाच्या परमोच्च शिखरावर आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. अभिनय क्षेत्र आणि चित्रपटसृष्टीतील त्याच्या कारकिर्दीचा अनेकांनाच हेवा वाटतो. अशा या अभिनेत्यावर आणि त्याच्या कुटुंबावर नेहमीच अनेकांच्या नजरा असतात. प्रसिद्धीच्या झोतात आल्यानंतर किंग खाननेही त्याच्या कुटुंबाला कधीच माध्यमांच्या नजरेआड ठेवलं नाही. त्याची पत्नी, मुलगी आणि मुलगेसुद्धा एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे आयुष्य जगत आहेत. पण, किंग खानच्या कुटुंबातील अशी एक व्यक्ती आहे जी आजही या झगमगाटाच्या दुनियेत फारशी दिसत नाही. ती व्यक्ती म्हणजे शाहरुखची बहिण शहनाज लालारुख.

शहनाज शाहरुखची मोठी बहिण आहे. ती त्याच्यासोबतच राहते. पण, प्रसारमाध्यमांमध्ये तिचा वावर फार कमी पाहायला मिळतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वडिलांच्या मृत्यूनंतर शहनाजला मानसिक धक्का बसला होता. बरेच दिवस उपचार केल्यानंतर ती या धक्क्यातून सावरली होती. आपल्या याच बहिणीविषयी एका मुलाखतीत सांगताना शाहरुख म्हणाला होता, ‘ती खूपच शांत असते. पण, ती जशी आहे तशी मला आवडते. वडिलांचा मृतदेह ज्यावेळी शाहरुखने घरी आणला तेव्हा शहनाज शाळेत गेली होती. तिला याविषयी काहीच सांगण्यात आलं नव्हतं. पण, जेव्हा हा सर्व प्रकार तिच्या लक्षात आला तेव्हा तिला जबर धक्का बसला. त्यानंतरच्या दिवसांमध्ये शहनाज आजारीच होती आणि कुटुंबाची सर्व जबाबदारी शाहरुखने सांभाळली.

वाचा : .. म्हणून शाहरुखच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांना एकही पैसा मिळणार नाही

शहनाजचं आजारपण इतकं वाढलं होतं की तिच्या जगण्याचीही शाश्वती नव्हती. आपल्या बहिणीच्या उपचारासाठी शाहरुखने तिला स्वित्झर्लंडला नेलं त्यानंतर सुरु झालेल्या उपचारांमुळे शहनाजची परिस्थिती सुधारु लागली. शहनाज नेहमीच साध्या राहणीमानाला प्राधान्य देते. त्याशिवाय शाहरुखच्या मुलांसोबतही तिचं खासं नातं आहे. किंग खानला शहनाज पावलोपावली साथ देते. मुख्य म्हणजे मोठी बहिण असल्यामुळे ती शाहरुखला मातृतुल्य आहे.