सध्या संपूर्ण जगात करोना व्हायरसची भीती पाहायला मिळते. करोनाचा फैलाव थांबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात २१ दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली. या घोषणेनंतर प्रत्येकाने जमेल त्या पद्धतीने मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले. कलाकरांनी समाजभान जपत करोनाविरोधात लढण्यासाठी मदतीचा हात पुढे केला. कोणी आर्थिक मदत केली तर कोणी जेवणाची व्यवस्था. ‘दे दे प्यार दे’ चित्रपटात अभिनेता अजय देवगणसोबत काम करणारी अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने देखील मदत केली आहे.

राकुल तिच्या आई-वडिलांसोबत गुरुग्राममध्ये राहते. ती तेथील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या २०० कुटुंबीयांसाठी दररोज दोन वेळचे जेवण देते. ‘माझ्या वडिलांनी या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांनाकडे सध्या काम नाही हे पाहिले. त्यामुळे मी आणि माझे कुटुंबीय लॉकडाउन संपेपर्यंत येथील लोकांना जेवण देणार आहोत’ असे टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये राकुलने म्हटले आहे.

View this post on Instagram

Sometimes getting lost helps you find yourself

A post shared by Rakul Singh (@rakulpreet) on

‘जर लॉकडाउनचा कालावधी वाढला तरी देखील मी या कुटुंबीयांना जेवण देत राहणार. या कुटुंबीयांना देत असलेले जेवण माझ्या सोसायटीमध्ये बनवले जातो आणि त्यानंतर या लोकांपर्यंत पोहोचवले जाते’ असे त्यांनी म्हटले आहे.

रकुल ही तेलुगू, तामिळ, हिंदी व कन्नड या भाषांमधील चित्रपटांमध्ये काम करते. २०१४ मध्ये तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘यारियाँ’ या चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली होती. रकुलने बऱ्याच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले असून तिने ‘मिस इंडिया’चाही किताब जिंकला होता.