रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केली. वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या एका चिठ्ठीत त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला होता. या संपूर्ण प्रकरणावर प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते राम गोपाल वर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अखेर उद्धव ठाकरे यांनी आपल्या वडिलांसारखी हिंमत दाखवली, असं म्हणत त्यांनी या कारवाईवर समाधान व्यक्त केलं आहे.

अवश्य पाहा – होऊ दे खर्च! १० मिनिटांच्या शॉर्ट फिल्मसाठी अभिनेत्रीने घातला ३७ कोटींचा ड्रेस

राम गोपाल वर्मा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडींवर ते रोखठोक मतं मांडतात. यावेळी त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. “ही कारवाई पाहून मला आनंद झाला. अखेर उद्धव ठाकरे यांनी आपल्या वडिलांसारखी हिंमत दाखवली. एका किंचाळणाऱ्या बोक्याला त्यांनी पिंजऱ्यात टाकलं. अशा आशयाचं ट्विट करुन राम गोपाल वर्मा यांनी समाधान व्यक्त केलं आहे.” त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडिावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – करोनामुळे वडिलांचं निधन; आठवड्याभरातच ‘या’ अभिनेत्रीनं केलं ग्लॅमरस फोटोशूट

अर्णब गोस्वामी यांना अटक कशासाठी ?

वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. ५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे. पैसे थकवल्याचा आरोप करत त्यांनी चिठ्ठीत अर्णब गोस्वामी यांना आत्महत्येला जबाबदार धरण्यात आलं होतं. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनीही हा आरोप केला आहे. त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात तक्रार दाखल केली होती.

रिपब्लिकचा काय दावा?

पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईवर रिपब्लिकने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पोलिसांनी घरात जबरदस्ती घुसखोरी करत अर्णब गोस्वामी यांच्यासोबत धक्काबुक्की केल्याचा रिपब्लिकचा दावा आहे. अर्णब गोस्वामी यांना पोलिसांकडून धमकावण्यात आल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. कोणतीही अधिकृत कागदपत्रं नसताना आणि बंद झालेल्या केसमध्ये ही अटक झाल्याचा दावा आहे.