अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीचा नवीन वाद पुन्हा एकदा समोर आला. सोशल मीडियावर स्टारकिड्सविरोधात मोहीम चालवली जात आहे. सुशांतचे चाहते घराणेशाहीविरोधात भाष्य करत आहेत. तर दुसरीकडे दिग्दर्शक राम गोपाल वर्माने करण जोहरला पाठिंबा दर्शविला आहे.

करण जोहरवर ज्याप्रकारे आरोप केले जात आहेत, याचा अर्थ लोकांनी फिल्म इंडस्ट्रीला समजूनच घेतलं नाही, असं राम गोपाल वर्माने ट्विटरवर लिहिलंय. ते म्हणाले, “१२ वर्षे इंडस्ट्रीत राहिल्यानंतर, पैसा आणि प्रसिद्धी मिळवल्यानंतर जर सुशांत इंडस्ट्रीत एकटं वाटल्याने आत्महत्या करू शकतो. तर त्याच्याइतकंही यश संपादन करू न शकणाऱ्या १०० कलाकारांची आत्महत्याही योग्य ठरू शकते. जे काही झालं त्यासाठी करण जोहरवर आरोप करणं म्हणजे तुम्ही अजून फिल्म इंडस्ट्रीला नीट समजू शकले नाही. जरी करण जोहरला सुशांतशी काही समस्या होती असं समजलो तरी कोणासोबत काम करायचं आणि कोणासोबत नाही याचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य करणला आहे.”

यापुढच्या ट्विटमध्ये घराणेशाहीचं समर्थन करत त्यांनी लिहिलं, “घराणेशाही नसेल तर समाजव्यवस्था ढासळेल कारण कुटुंबातील प्रेमच समाजाचा आधार आहे. ज्याप्रकारे तुम्ही दुसऱ्या पत्नीवर जास्त प्रेम करू शकत नाही आणि ज्याप्रकारे तुम्ही दुसऱ्यांच्या मुलांना आपल्या मुलांपेक्षा जास्त प्रेम नाही करू शकत.”

या ट्विटनंतरही राम गोपाल वर्मा ट्रोल झाले आहेत. घराणेशाहीच्या मुद्द्यावरून कंगना रणौत, प्रकाश राज यांसारख्या कलाकारांनी सोशल मीडियावर मत व्यक्त केलं आहे.