काही दिवसांपूर्वी निर्माता, दिग्दर्शक राम गोपाल वर्माने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला करोनाची लागण झाल्याची माहिती देत एप्रिल फूल केले होते. त्याच्या या ट्विटनंतर त्याच्यावर नेटकऱ्यांनी निशाणा साधला होता. नेटकऱ्यांनी सध्याची देशातील परिस्थिती पाहता राम गोपाल वर्मा यांनी अशी थट्टा करणे चुकिचे आहे असे म्हटले आहे. पण आता राम गोपाल वर्मा यांनी असे का केले हे समोर आले आहे.

मिड-डेने दिलेल्या वृत्तामध्ये ‘अशा गंभीर परिस्थितीमध्ये आपण विनोद करत रहायला हवं, अन्यथा आपण नैराश्यात जावू. माझ्या या ट्विटनंतर मी ट्रोल होणार हे मला माहित होते. चुकीची माहिती दिल्यामुळे माझ्याविरोधत तक्रार दाखल करण्यात आली. पण तो एक एप्रिल फूलचा विनोद होता, दुसरे काहीच नाही’ असे राम गोपाल वर्मा यांनी म्हटले आहे.

काय होते राम गोपाल वर्माचे ट्विट?
‘माझ्या डॉक्टरने मला आता सांगितले की मी करोना पॉझिटिव्ह आहे’ असे राम गोपाल वर्माने ट्विटमध्ये म्हटले होते. पण त्यानंतर काही वेळात त्यांनी ‘तुमची निराशा केल्याबद्दल माफी मागतो. पण आता डॉक्टर म्हणाले की मी एप्रिल फूल करत होतो. ही त्यांची चूक आहे माझी नाही’ हे ट्विट केले. त्यांच्या या दोन्ही ट्विटमुळे त्यांना सोशल मीडियावर चांगलेच सुनावण्यात आले होते. अनेकांनी त्यांच्या विरोधात चुकिची माहिती देत असल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती.